
सामना प्रतिनिधी । मुंबई
संख्या वाचनाच्या नवीन पद्धतीवर फडण अधिक वीस अशी टीका करणार्या विरोधकांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सडेतोड उत्तर देत, आई कमळ बघ, छगन कमळ बघ, शरद गवत आण असे पाठ्यपुस्तकातील उतार्यांचे वाचन करीत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात हास्यकल्लोळ उडवून दिला. मात्र त्याच वेळेस संख्यावाचनाच्या पद्धतीबाबत जर सदस्यांचे आक्षेप असतील तर तज्ञांची समिती नेमण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
संख्यावाचनाच्या नवीन पद्धतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फडण अधिक वीस अशी टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना सडेतोड उत्तर दिले. मुलांच्या आकलन क्षमतेनुसार अभ्यासक्रमात बदल करण्याच्या सूचना एससीईआरटीने नेमलेल्या तज्ञांच्या समितीने सूचना केल्या होत्या. त्यानुसार संख्यावाचन पद्धतीत बदल करण्यात आले आहेत. पण सभागृहाची जर भावना असेल तर तज्ञांची समिती नेमू. या समितीकडून अभ्यास होईल व समितीकडून शिफारशी मागवून त्याचा विचार करू, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आई कमळ बघ…
अजित पवार यांनी या विषयावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आडनावावरून कोटी केली होती. फडण अधिक वीस शून्य असे ते म्हणाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी त्याची सव्याज परतफेड केली. पाठ्यपुस्तकाच्या पानाची झेरॉक्स कॉपी सभागृहात आणली होती. त्यातील पहिलीच्या बालभारतीतीत पुस्तकातील उतारे त्यांनी वाचून दाखवले. आई कमळ बघ, दादा कमळ बघ, छगन कमळ बघ, शरद गवत आण, हसन पटकन उठ असे उतारे त्यांनी वाचून दाखवले तेव्हा सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला.
एससीईआरटीने याबाबत तज्ञांची समिती नेमली होती. या समितीने मुलांच्या अध्ययन क्षमतेचा अभ्यास करून नवीन अभ्यासक्रमात बदल सुचवले. बोलायला काय सोपे पडेल? लक्षात पटकन कशा पद्धतीने राहील? याबाबत सुधारणा सुचवल्या. त्यात वीस अधिक दोन लिहिले आहे; पण पुढे बावीस असाही उल्लेख आहे. ही पद्धत का अवलंबली याबाबत या तज्ञांनी स्पष्टदेखील केले आहे.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री






















































