साचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्यासाठी स्पेशल कंट्रोल रूम!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-highcourt

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईत अतिवृष्टी झाली तरी पाण्याचा निचरा वेगाने व्हावा यासाठी लवकरच ‘स्पेशल कंट्रोल रूम’ सुरू करण्यात येणार आहे. वरळीत हे केंद्र सुरू होणार असून शहर आणि उपनगरातील पाण्याच्या निचऱ्यावर २४ तास वॉच ठेवला जाणार आहे. तुंबणाऱ्या नाल्यांची ‘लाईव्ह’ माहिती या कंट्रोल रूममध्ये मिळणार असून तातडीने उपाययोजना केली जाणार आहे. त्यामुळे पाणी साचण्याचे प्रमाण कमी होणार आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज ही माहिती दिली.

मुंबईत गेल्या काही दिवसांत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सखल भागांत पाणी साचले. यावरून विरोधकांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आयुक्तांना पालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्याचे निर्देश दिले. यावेळी आयुक्त अजोय मेहता यांनी पालिकेने केलेल्या कामांची माहिती देताना पाणी तुंबणाऱ्या २०५ ठिकाणांपैकी १०५ ठिकाणी या वर्षी पाणी तुंबले नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. ज्या ठिकाणी पाणी साचले त्या ठिकाणच्या पाण्याचा निचरा काही वेळातच झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईत अतिवृष्टी सुरू असताना तब्बल चार हजार कर्मचारी-अधिकारी फिल्डवर काम करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे पालिका काहीच काम करीत नसल्याचा विरोधकांचा आरोप चुकीचा असल्याचे सांगताना ‘स्तुती नको तर किमान केलेले काम तरी मान्य करा’ असे आवाहनही त्यांनी केले.

असा असणार कंट्रोल रूम

वरळीत सुरू होणाऱ्या कंट्रोल रूममध्ये मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरातील संपूर्ण नालेसफाईची माहिती असेल. नालेसफाईच्या आधीची स्थिती, नालेसफाई आणि नालेसफाई झाल्यानंतरच्या स्थितीवर लक्ष ठेवले जाईल. एखाद्या ठिकाणी कचऱ्यामुळे पाणी तुंबले, तुंबण्याची स्थिती निर्माण झाली तर तातडीने उपाय करणे शक्य होणार. विशेष म्हणजे हा कंट्रोल रूम खास नालेसफाई आणि अतिवृष्टीत निर्माण होणाऱ्या स्थितीवर नियंत्रण ठेवण्याचेच काम करेल.

अशा आहेत मर्यादा

– ट्रफिकमुळे काही ठिकाणचे काम करण्यास विलंब.
– हिंदमातासारख्या ठिकाणी केबल, लाइटची वायरिंग असल्यामुळे काम करताना मर्यादा.
– अनेक जलवाहिन्या ब्रिटिशकालीन असल्यामुळे झाडांची मुळे जाऊन ब्लॉक झाल्या.
– मोठय़ा प्रमाणावर काँक्रीटीकरण होत असल्यामुळे पाणी जिरण्यास जागाच शिल्लक नाही.

 अशा करणार उपाययोजना

– सोसायटय़ा, गार्डनच्या ठिकाणी पाणी जिरण्यासाठी खास जागा सोडणे बंधनकारक करणार.
– पंपिंग स्टेशनची संख्या वाढवणार.
– पाणी साचणारे नवी ठिकाणे का तयार झाली याची कारणे शोधून उपाययोजना करणार.
– पाणी साचण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी खास धोरण आखणार.