नगर महापालिकेच्या वतीने नालेसफाईच्या कामाला गती देण्यात आली आहे. चार पोकलेन व एका जेसीबीच्या साहाय्याने शहरात पाच ठिकाणी काम सुरू आहे. यात गुलमोहर रोड परिसरातील मंगल हाउसिंग सोसायटीजवळ असलेल्या नाल्यात टाकण्यात आलेले पाईप हटवून प्रवाह मोकळा करण्यात आला आहे.
वेळेपूर्वीच राज्यात मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत नगर शहरातही पावसाला सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी नालेसफाईच्या कामाला गती देण्याचे आदेश दिले होते. मशिनरी वाढविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कामाला गती देण्यात आली आहे. सद्यस्थितीत हॉटेल सनी पॅलेसजवळून सुरू करण्यात आलेल्या नालेसफाईचे काम भिस्तबाग परिसरातील गजराज फॅक्टरीपर्यंत आले आहे. तसेच भोसले लॉन येथून सुरू करण्यात आलेले काम नगर कॉलेजच्या मागील बाजूपर्यंत आले आहे. मंगल हाउसिंग सोसायटीपासून सुरू झालेले काम सपकाळ हॉस्पिटलपर्यंत आले आहे. रवीश कॉलनी, फुलसौंदर मळापासून लोखंडी पुलापर्यंत काम सुरू आहे. यासह आणखी काही ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने नालेसफाई केली जात आहे.
गटारी स्वच्छतेकडे होतेय दुर्लक्ष
येत्या आठवडाभरात वारंवार पाणी साचणाऱ्या भागातील नालेसफाईचे काम पूर्ण करण्याचे नियोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे उपनगरांत काही ठिकाणी नालेसफाईच्या कामात अडथळे आले होते. मात्र, ते दूर करून काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, ओढे व नाल्यांतील गाळ काढण्याचे काम सुरू असले तरी शहराच्या मध्यवर्ती भागातील व उपनगर भागातील पावसाळी गटारीच्या स्वच्छतेचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.