
छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या मैदानावर पुन्हा एकदा शिवाजी पार्क जिमखान्याच्या (एसपीजी) क्रिकेटचा जंगी जल्लोष रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीने लौकिक मिळवणाऱया विजय मांजरेकर आणि रमाकांत देसाई या दिग्गजांच्या गौरवार्थ शिवाजी पार्क जिमखान्याने 15 ते 18 एप्रिल दरम्यान एसपीजी टी-20 स्पर्धेचे दिमाखदार आयोजन केले आहे.
एसपीजीने यंदा स्पर्धेची व्याप्ती दुप्पट करत थेट 16 संघांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील अव्वल दर्जाचे 14 अ-गटातील संघ आणि अन्य नामांकित संघ यामध्ये भिडणार आहेत. क्रिकेटप्रेमींना शिवाजी पार्क जिमखाना, यंग महाराष्ट्र, भारत क्रिकेट क्लब आणि बंगाल क्रिकेट क्लब या चार मैदानांवर क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळेल. या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेला आयडीबीआय बँक आणि एलआयसीचे पाठबळ लाभल्यामुळे आयोजकांनी पुरस्काराची रक्कमही वाढवण्यात आल्याची माहिती जिमखान्याचे सचिव संजीव खानोलकर यांनी दिली. विजेत्या संघाला 1 लाख, उपविजेत्याला 50 हजार, मालिकावीराला 25 हजार, तर सर्वोत्तम फलंदाज आणि गोलंदाजांना प्रत्येकी 10 हजार रुपये देण्यात येणार आहेत. याशिवाय प्रत्येक सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूलाही गौरवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदुस्थानी क्रिकेटमधील एक नावाजलेले नाव असलेल्या एसपीजीने सर्वप्रथम 1998 मध्ये विजय मांजरेकर एकेरी आणि रमाकांत देसाई दुहेरी विकेट स्पर्धांची सुरुवात केली आणि त्यानंतर 2014 पासून या स्पर्धेला टी-20च्या रंगात रंगवले. तेव्हापासून ही स्पर्धा युवा क्रिकेटपटूंसाठी लाँचिंग पॅड ठरतेय.
यंदाची स्पर्धा मात्र अधिकच महत्त्वाची ठरणार आहे. मुंबई क्रिकेट संघटनेच्या मुंबई प्रीमियर लीगच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा म्हणजे तरुणांसाठी थेट सिलेक्शनची रंगीत तालीमच असेल. स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आणि निवड समितीचे लक्ष वेधण्यासाठी खेळाडू या स्पर्धेच्या निमित्ताने मैदानात जीव ओतून खेळणार हे निश्चित आहे. त्यामुळे ही स्पर्धा अधिकच थरारक होईल, असा विश्वास एसपीजीचे संयुक्त सचिव सुनील रामचंद्रन यांनी बोलून दाखवला. याप्रसंगी जिमखान्याचे उपाध्यक्ष विश्वास नेरूरकर, खजिनदार विलास सोमण आणि क्रिकेट विभागाचे चिटणीस सुधाकर हरमळकरही उपस्थित होते.

























































