मसालेदार…चटकदार कोशिंबीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मीना आंबेरकर

कोशिंबीर

पानाची डावी बाजू सजवण्याचे काम कोशिंबीर करते. कोशिंबिरीला मुख्य पदार्थाइतके महत्त्व नसले तरी तिच्या अस्तित्वाशिवाय जेवणाला किंवा जेवणाऱया पानावर पूर्णत्व येऊ शकत नाही. हा काही खूप चटकदार पदार्थ नाही, परंतु आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी या पदार्थाची योजना केली आहे. आहारातील फायबर हा आवश्यक घटक या पदार्थामुळे मिळतो. या फायबरमुळे आपला कोठा साफ राहतो. भूक वाढते. वेगवेगळी जीवनसत्त्वे या कोशिंबिरीमुळे आपल्याला मिळतात. या पदार्थाला चव आणण्यासाठी ओली मिरची, कोथिंबीर, चाट मसाला, लिंबू यांचा वापर करण्यात येतो. बघू या तर काही विविध कोशिंबिरी…

bhaji-koshm

मिश्र भाज्यांची कोशिंबीर

साहित्य…अर्धी वाटी बारीक चिरलेली सिमला मिरची, 1 मध्यम काकडी, अर्धी वाटी गाजराचा कीस, 3 लाल घट्ट टोमॅटो, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, 1 पातीचा कांदा पातीसकट बारीक चिरून, अर्धी वाटी शेंगदाणा तेल, 2 चमचे व्हिनेगर, 1 चमचा साखर, 1 चमचा पुदिना पाने बारीक चिरून, चिमूटभर मोहरी, डाळीची पूड, मीठ.

कृती…काकडी तासून बारीक चिरावी. टोमॅटो बारीक चिरावेत. नंतर सिमला मिरची, गाजर कीस, कोथिंबीर चिरलेली, पातीचा कांदा हे सर्व एकत्र करावे. मीठ घालून ढवळावे. तेल, व्हिनेगर, साखर, पुदिना पाने व मोहरी पूड एकत्र करावी व ढवळावे. नंतर हे मिश्रण कोशिंबिरीत घालावे. दोन्ही हातांनी भांडे हलवून कोशिंबिरीत व्हिनेगर घालून मिश्रण एकजीव करावे. थंडगार करून वाढावे.

फळांची कोशिंबीर

साहित्य...एक सफरचंद, दोन केळी बेताची पिकलेली, सीझनप्रमाणे एक संत्रे, द्राक्षे, पेरू, डाळिंब, एक मोठा बटाटा, मीठ चवीप्रमाणे, 2 चमचे चाट मसाला, लिंबाचा रस 2 चमचे, 1 चमचा साखर.

कृती...बटाटा उकडून सोलून घ्यावा. नंतर त्याच्या बारीक फोडी कराव्यात. सफरचंदाची साले व्यवस्थित काढावी व त्याच्या सारख्या आकाराच्या फोडी कराव्यात. फोडींना थोडा लिंबू रस लावावा. म्हणजे त्या काळ्या पडणार नाहीत. केळ्याच्यासुद्धा गोल आकाराच्या चकत्या करून त्यांनाही लिंबू रस लावावा. संत्रे सोलून बिया काढून टाकाव्यात व पाकळ्या वेगळ्या कराव्यात. मध्ये मध्ये येणारे दोरही काढून टाकावेत. पेरूचे साल थोडेसे काढून टाकून त्याच्या फोडी कराव्यात. द्राक्षे स्वच्छ धुऊन घ्यावीत व वरील फळांच्या फोडींमध्ये मिसळावीत. सर्व फोडींवर उरलेला लिंबाचा रस, चवीपुरते मीठ व साखर मिसळावी. चाट मसाला घालून एकत्र करावे. काचेच्या बाऊलमध्ये काढून वरून डाळिंबाचे दाणे घालावेत. सर्व फोडी वाढण्याआधी थोडा वेळ एकत्र करून कालवाव्यात. नाहीतर पाणी सुटेल.

koshm-12

रताळ्याची कोशिंबीर

साहित्य...रताळी पाव किलो, नारळाचा चव अर्धी वाटी, हिरवी मिरची, लिंबू, साखर, कोथिंबीर, फोडणीचे साहित्य, मीठ चवीपुरते.

कृती…रताळी उकडून घ्यावीत. त्याच्या वरची साले काढावीत. बारीक चिरून त्यात नारळाचा चव, लिंबू, साखर घालून भरलेल्या मिरचीचे किंवा हिरव्या मिरचीचे तुकडे घालून फोडणी द्यावी. नंतर कोथिंबीर घालून सारखे करावे. त्यात हळद घालू नये. उपवासाची कोशिंबीर असल्यास त्याकरिता जिरे, हिरवी मिरची घालून तुपाची फोडणी द्यावी.

कडधान्याची कोशिंबीर

साहित्य…1 वाटी मोड आलेली कडधान्ये जास्तीत जास्त प्रकारची घ्यावीत. दही 1 वाटी, मीठ, मिरची चवीप्रमाणे, तेल व हिंग.

कृती…सर्व कडधान्ये मिक्सरमधून जाडसर काढावीत. तेव्हाच त्यात मीठ व मिरची घालावी. लोखंडी पळीत थोडे तेल घालून ते तापल्यावर हिंग घालावा व फोडणी घालावी. नंतर घट्ट दही घालून कालवावे.