एमआयएम आणि वंचितचं फाटलं!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये फूट पडली आहे. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जागावाटपात सन्मान राखला नाही, असे सांगत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे.

लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडी आणि एमआयएमच्या आघाडीने भल्याभल्यांना घाम फोडला होता. संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या उमेदवाराचा विजय झाला होता. या आघाडीने राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीची धुळधाण उडवली होती. अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम काय कमाल करणार याकडे सर्वांचे लक्ष होते, मात्र जागावाटपावरून दोन्ही पक्षांचे अखेर फाटले आहे.

एमआयएमने 2014 विधानसभा निकडणुकीत 24 जागा लढवल्या होत्या. यामध्ये दोन जागांवर विजय मिळाला. नऊ ठिकाणी एमआयएम दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर होती. सध्या पक्षाचे विविध जाती-जमातीचे जवळपास 150 नगरसेवक आहेत. जिथे एमआयएमचे आमदार आहेत त्या जागाही आंबेडकरांनी सोडल्या नाहीत. संभाजीनगर पालिकेत एमआयएमचे 26 नगरसेवक आहेत. विरोधी पक्षनेते आणि गटनेते हे अनुसूचित जातीतील आहेत. तरीही केवळ 8 जागा हा एक प्रकारे अन्याय असल्याचे एमआयएमचे म्हणणे आहे. बहुजन वंचित आघाडीसोबत आमची युती झाली नसली तरी समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. एमआयएम स्वबळावर लढेल. लवकरच इच्छुकांच्या मुलाखती होतील, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

एमआयएमला 8 जागांची ऑफर अमान्य

एमआयएमने वंचित बहुजन आघाडीचे नेते आंबेडकर यांच्याकडे  95 जागांची मागणी केली होती. यासंदर्भात आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांच्यात दोनवेळा बैठका झाल्या, तर खासदार इम्तियाज जलील यांच्याबरोबर तीन बैठका झाल्या, मात्र जागांबाबतचा निर्णय होऊ शकला नव्हता. त्यानंतर आंबेडकरांनी असदुद्दीन ओवैसी यांना ई-मेल पाठकून 8 जागांची ऑफर दिली आहे. ती मान्य नसल्याने एमआयएमने वंचित आघाडीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचे इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले आहे.

ओवेसींचा निरोप येईपर्यंत युती कायम

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत काडीमोड घेतल्याचे जाहीर केले आहे, मात्र वंचित आघाडीच्या वर्किंग कमिटीतर्फे रतन बनसोडे यांनी एक पत्रक काढून एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांच्याकडून युती न होण्याबाबत कळवले जात नाही, तोपर्यंत युती कायम असल्याचे म्हटले आहे. एमआयएमने विधानसभेसाठी 17 जागांची यादी पाठवली होती. त्यावर चर्चा सुरू असून युती तोडल्याचे कोणतेही पत्र प्राप्त झालेले नसल्याचे म्हटले आहे.