
देशाच्या राजधानीतील प्रतिष्ठत जवाहरलाल नेहरू स्टेडियम आता नव्या रूपात दिसणार आहे. केंद्र सरकारने या स्टेडियमची ‘क्रीडानगरी’ म्हणून पुनर्विकास करण्याची तयारी सुरू केली आहे. या प्रकल्पांतर्गत विद्यमान स्टेडियम पाडून पुन्हा उभारण्यात येईल, ज्यामध्ये सर्व प्रमुख क्रीडा प्रकारांसाठी अत्याधुनिक सुविधा आणि खेळाडूंसाठी निवासाची व्यवस्था असेल.
क्रीडा मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. हा ‘क्रीडानगरी’चा प्रकल्प सध्या प्रस्तावाच्या टप्प्यात असून, यासाठीचा खर्च आणि कालमर्यादा अद्यापि निश्चित झालेली नाही. सूत्रांनी सांगितले, ‘स्टेडियम पाडले जाणार आहे. सध्या येथे असलेली नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी (नाडा), नॅशनल डोप टेस्टिंग लॅबोरेटरी (एनडीटीएल) आणि आयकर विभाग प्रकल्प ही कार्यालयेही स्थलांतरित केली जातील.’
सुमारे 102 एकर जागेवर पसरलेल्या या स्टेडियमचा वापर सध्या पूर्ण क्षमतेने होत नसल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. नव्या ‘क्रीडा नगरी’ प्रकल्पामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा आयोजित करता येतील. खेळाडूंसाठी प्रशिक्षण पेंद्रे आणि निवास सुविधा उपलब्ध होतील. तसेच मनोरंजनाशी संबंधित कार्यक्रमांचाही समावेश केला जाईल.
सध्या या स्टेडियममध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) मुख्यालय आणि सरकारच्या ‘खेळो इंडिया’ प्रकल्पाचे कार्यालय आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या योजनेसाठी अनेक मंत्रालयांचे विशेषतः शहरी विकास मंत्रालयाचे सहकार्य आवश्यक असेल. त्यामुळे प्रकल्पाची त्वरित अंमलबजावणी होण्याची शक्यता कमी आहे. ‘ही कल्पना सध्या विचाराधीन असली तरी मंत्रालय या दिशेने गांभीर्याने पुढे जाण्याच्या तयारीत आहे,’ असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
जवाहरलाल नेहरू स्टेडियम 1982 साली आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी बांधण्यात आले होते. 2010च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यान त्याचे 900 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून पुनर्निर्माण करण्यात आले. अलीकडेच येथे जागतिक पॅरा-अॅथलेटिक्स स्पर्धाही पार पडली, ज्यासाठी नवीन मोंडा ट्रक बसवण्यात आला होता.

























































