कोल्हापूर विभागात दहावीचा निकाल 97.64 टक्के; मुलींची बाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी परीक्षेचा निकाल बुधवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. राज्यातील नऊ विभागात कोल्हापूर विभाग 97.64 टक्के मिळवत दुसऱ्या स्थानावर आहे. तर विभागात 98.21 टक्क्यांसह कोल्हापूर जिल्हा प्रथम, 97.25 टक्क्यांसह सातारा जिल्हा दुसऱ्या आणि 97.22 टक्क्यांसह सांगली जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात 11.06 टक्के अशी वाढ झाली आहे. तसेच निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

कोल्हापूर विभागातील तिन्ही जिल्ह्यात एकूण 354 केंद्रावर ही परीक्षा झाली. एकूण 1 लाख 33 हजार 917 पैकी 1 लाख 30 हजार 751 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये सातारा 38,688, सांगली 37,402 आणि कोल्हापूरातुन 54,661 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या तिन्ही जिल्ह्यात एकूण 72,191 पैकी 69,900 मुले (96.83%) आणि 61,726 पैकी 60,851 मुली (98.58) उत्तीर्ण झाल्या आहेत.

सातारा जिल्ह्यात 20,323 (96.24%,) मुले उत्तीर्ण झाले. मुली 18,365 (98.38 %) उत्तीर्ण झाल्या. सांगली जिल्ह्यात 20,015 (96.20%) मुले उत्तीर्ण झाले.मुली 17,387(98.42%) उत्तीर्ण झाल्या. तर कोल्हापूर जिल्ह्यात 29,562 (97.60%) मुले आणि 25,099 (98.85%) मुली उत्तीर्ण झाल्या. परीक्षा काळात गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या 45 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दोन विद्यार्थ्यास पुढे पाच वर्षे परीक्षेसाठी बंदी घातली आहे. तर 43 विद्यार्थ्यांनी ज्या विषयांत गैरमार्ग केला.त्या विषयाची संपादणूक रद्द करण्यात आली आहे. गेल्या वर्षी गैरमार्गाचे 90 प्रकार समोर आले होते. यंदा त्यामध्ये निम्मी घट झाली असून,सांगली वगळता सातारा 16 आणि कोल्हापूर जिल्ह्यात 29 गैरमार्गाचे प्रकार आढळले आहेत.

रिपीट विद्यार्थ्यांत कोल्हापूर आघाडीवर
यंदा तिन्ही जिल्ह्यांत 8,998 रिपीट विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली.यापैकी 6,785 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रिपीट विद्यार्थ्यांमध्ये कोल्हापूर विभागाची टक्केवारी 75.41% राहिली.विभागात सातारा जिल्ह्यात 72.86%,सांगली जिल्ह्यात 75.14% आणि कोल्हापूर जिल्ह्यात 78.42% रिपीट विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.