
राज्य परिवहन महामंडळात ‘चालक तथा वाहक’ हे पद नव्याने निर्माण केल्याने कर्मचाऱयांना मोठा फटका बसला आहे. नव्या पदावरील कर्मचाऱयांना चालकाच्या मंजुरीत समाविष्ट केले आहे. त्यामुळे चालक पदात अतिरिक्त कर्मचारी झाले असून चालक आणि वाहक पदावरील पाच हजार कर्मचाऱयांना हंगामी वेतन श्रेणीवर काम करावे लागत आहे.
एसटीच्या स्थापनेपासून चालक आणि वाहक पदासाठी स्वतंत्र भरती केली जात होती. मात्र 2016 मध्ये ‘वाहक’ पद गोठवून ‘चालक तथा वाहक’ असे एकत्रित पद निर्माण करण्यात आले. ते पद चालकाच्या मंजुरीत समाविष्ट केल्याने त्याचा फटका राज्यभरातील पाच हजार चालक व वाहकांना बसला. चालक व वाहक या दोन्ही पदांचे एकत्रीकरण केल्यास कर्मचाऱयांचा प्रश्न सुटू शकेल. त्यादृष्टीने कार्यवाही करण्याची मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी परिवहनमंत्र्यांकडे केली आहे.