सहलींसाठी एसटी सहज भाड्याने मिळणार!

प्रातिनिधिक फोटो

लग्न, यात्रा, धार्मिक व शैक्षणिक सहलींसाठी शाळा, सामाजिक संस्था आणि खासगी व्यक्तींना एसटी भाडय़ावर मिळण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. भाडेतत्त्वावर (प्रासंगिक करार) एसटी बसेस उपलब्ध करून देण्याचे प्रमाण वाढवून एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढावे यासाठी नियोजन करण्यात येत असून विभागीय पातळीवरील अधिकारी, पर्यवेक्षक यांची पालक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे.

ज्या शैक्षणिक संस्थांनी यापूर्वी प्रासंगिक भाडेतत्त्वावर सहलीसाठी एसटी बसेस घेतली होती अशा संस्थांशी विभाग-आगार पातळीवर संपर्क साधावा. ज्या शैक्षणिक संस्थांनी यापूर्वी एसटी महामंडळाची बस न घेता खासगी बसेस वापरल्या असतील तर अशा संस्थांशी संपर्क साधून महामंडळाच्या बसेस भाडय़ाने घेण्याबाबत विनंती करावी, अशा सूचना एसटी प्रशासनाने संबंधितांना दिल्या आहेत.

विश्वासार्हता आणि वक्तशीरपणा

भाडेतत्त्वावर (प्रासंगिक करार) बसेस उपलब्ध करून देताना कोणतेही बस मार्ग बंद राहणार नाहीत किंवा कामासाठी अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. शैक्षणिक संस्था व सामाजिक संस्थांनी सहली आणि इतर उपक्रमांकरिता विश्वासार्हता, वक्तशीरपणामुळे एसटी महामंडळाच्याच बसेस भाडय़ाने घेण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या