
नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने मुंबई सेंट्रल ते पणजी अशी विनावातानुकूलित ‘शयनयान कम आसनी’ बससेवा 9 डिसेंबरपासून सुरू केली आहे. ही बस चिपळूण, कणकवली, सावंतवाडी, म्हापसामार्गे पणजी गाठणार आहे.
अनलॉक सुरू झाल्याने राज्य सरकारने पर्यटनस्थळे सुरू केली आहेत. त्यात लांब पल्ल्यांच्या ट्रेन बंद सेवा तसेच विमान सेवेवर बंधने असल्याने नाताळ तसेच नवीन वर्ष स्वागतासाठी गोव्याला जाणाऱयांची संख्या पाहून एसटी महामंडळाने आपली ‘शयनयान कम आसनी’ सेवा मुंबई सेंट्रल ते पणजी मार्गावर सुरू केली आहे. या बसमध्ये 15 स्लीपर आणि 30 पुश बॅक सीटची सुविधा एकत्र असून दोन्ही सेवांचे तिकीट दर सारखेच आहेत. 9 डिसेंबरपासून ही बससेवा सुरू झाली असून ही बस मुंबई सेंट्रल येथून संध्याकाळी 4.30 वाजता तर पणजी येथून संध्याकाळी 4.00 वाजता सुटणार आहे. या बसचे आगाऊ आरक्षण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच MSRTC mobile reservation अॅपवरही आगाऊ आरक्षण करता येणार आहे. या बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळामार्फत करण्यात येत आहे.
तिकीट दर फलक
मुंबई सेंट्रल – पणजी 965 रु.
मुंबई सेंट्रल – म्हापसा 950 रु.
मुंबई सेंट्रल – बांदा 895 रु.
मुंबई सेंट्रल – सावंतवाडी 875 रु.
मुंबई सेंट्रल – कणकवली 785 रु.

























































