
लॉकडाऊनमुळे एसटीची सेवा 22 मार्चपासून तब्बल 60 दिवस बंद केली होती. आता ग्रामीण भागामध्ये मर्यादीत स्वरुपात का होईना 22 मेपासून एसटी सुरू झाली आहे. परंतु महिना होत आला तरीही एसटीला प्रवाशांचा हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता एसटीच्या वेळापत्रकाचा फेरआढावा घेण्यात येऊन नव्याने मार्ग ठरविण्यात येणार असून जेथे प्रवासी मिळण्याची हमखास खात्री असेल केवळ तेथेच एसटीच्या फेऱयांना मंजूरी दिली जाणार आहे.
कोरोना संकटापासून वाचण्यासाठी एसटीच्या जिल्हांतर्गत सेवा जरी बंद असल्या तरी सध्या गाव ते तालुका आणि गाव ते जिल्हा या मार्गावर एसटीच्या केवळ 30 टक्के बसेस सुरू आहेत. या बसला देखील एकूण प्रवासी क्षमतेच्या केवळ दहा ते वीस टक्केच प्रवासी लाभत आहेत. त्यामुळे एसटीचा दैनंदिन खर्च भागवण्यासाठीचे उत्पन्न देखील त्यातून मिळणे कठीण झाले आहे.
हीच परिस्थिती पुढील सहा महिने राहणार असल्याने भविष्यात काटकसर करून केवळ गरजेपुरतीच साधनसामग्री आणि मनुष्यबळ वापरून खर्च आटोक्यात आणण्याचा प्रयत्न एसटीमार्फत करण्यात येत आहेत.























































