एसटीचालकाने वाचवले 33 प्रवाशांचे प्राण; स्टेअरिंग जाम होताच एसटी डोंगरावर आदळवली, मुंबई-रामदास पठार बसचा वरंध घाटात अपघात

मुंबईहून रामदास पठारच्या दिशेने निघालेल्या एसटीला आज सकाळी वरंधा घाटात भीषण अपघात झाला. बसचे स्टेअरिंग जाम झाल्याचे समजताच चालकाने प्रसंगावधान राखून बस डोंगरावर आदळवली आणि ३३ प्रवाशांचे प्राण वाचवले. या अपघातात ३० प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर वरंध प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये २० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

मुंबईहून रामदास पठारच्या दिशेने निघालेल्या एसटीत २३ विद्यार्थी आणि १३ प्रवासी प्रवास करत होते. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास बस वरंधा घाटात आली असता बसचे स्टेअरिंग जाम झाल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून घाटातील रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगरावर एसटी आदळली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट उडाली. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. यात ३० जण जखमी झाले असून त्यांच्यावर वरंध येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

गळके छत, तुटके दरवाजे-खिडक्या, झिजलेले टायर अशा एसटीमधून हजारो प्रवाशांना प्रवास करावा लागतो. नादुरुस्त गाड्या प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत. महाड आगारातील बहुतांश एसटी नादुरुस्त स्थितीत आहेत. वरंध हा घाटमार्ग असल्याने प्रवाशांचा जीवाशी होणारा खेळ थांबवावा आणि सुस्थितीत असलेल्या गाड्या पाठवण्यात याव्यात.
विष्णू खोपडे, स्थानिक