एसटी कामगारांची थकीत देयके, प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करणार

एसटी कामगारांची थकीत देयके तसेच इतर प्रलंबित मागण्यांबाबत कामगार संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. एसटी महामंडळातील कामगारांच्या अनेक आर्थिक मागण्या बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे एसटी कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. सरकारने 10 ऑक्टोबरपूर्वी कामगारांचे प्रश्न न सोडवल्यास काम बंद आंदोलन केले जाईल, त्या आंदोलनाला प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार सेना आणि एसटी कामगार संयुक्त कृती समितीने दिला आहे.

एसटी कामगारांचा अनेक वर्षांपासून थकीत असलेला महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढ आणि वेतनवाढीच्या फरकाची रक्कम कामगारांना अदा करणे तसेच कामगारांच्या इतर प्रश्नांबाबत प्रशासन आणि सरकारशी वेळोवेळी लेखी पत्रव्यवहार करण्यात आला. त्याबाबत सामंजस्याने चर्चा झाल्या, मात्र सरकारने कोणत्याही मागण्या पूर्ण केल्या नसल्याने संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मागण्या मान्य न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन

एसटी कामगारांच्या न्याय्य हक्काचे प्रश्न सोडवणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. सरकारला हीच जाणीव करून देण्यासाठी 13 ऑक्टोबरपासून संयुक्त कृती समितीच्या वतीने एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाईल. त्यानंतरही सरकार आणि परिवहन महामंडळाने मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही न केल्यास संपूर्ण राज्यभरातील सर्व विभागांत तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.