
बिहारमधील नालंदा जिल्ह्यात एक भीषण दुर्घटना घडली आहे. मगडा येथील प्रसिद्ध शीतला देवी मंदिरात अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत 8 महिला भाविकांचा मृत्यू झाला असून 12 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
नालंदा जिल्ह्यातील मगडा येथे शीतला देवी मंदिरात दर मंगळवारी पूजेसाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. उत्तर हिंदुस्थानातील पंचांगाप्रमाणे आज चैत्र महिन्याचा शेवटचा मंगळवार असल्याने सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. यादरम्यान अचानक मंदिरात चेंगराचेंगरी सुरू झाली. गोंधळ उडाल्याने लोक सैरावैरा धावू लागले. अचानक सुरू झालेल्या या गोंधळात अनेक महिला खाली पडल्या आणि गर्दीखाली चिरडल्या गेल्या. यात 8 महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आणि नालंदा जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
शीतला देवीच्या दर्शनासाठी दर मंगळवारी प्रचंड गर्दी होते. आजही महिलांनी मोठी गर्दी केली होती. दर्शनासाठी रेटारेटी सुरू झाली आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणाही उपस्थित नव्हती, अशी प्रतिक्रिया पाटणाहून दर्शनासाठी आलेल्या ममता देवी यांनी ‘एएनआय’शी बोलताना दिली.
#WATCH | Nalanda, Bihar: Mamata Devi, a devotee, says, “It is always crowded here on Tuesday. People come for Sheetla Mata’s darshan. We too have come from Patna for darshan. But a stampede broke out, and people died. It happened due to mismanagement…An ambulance has reached… pic.twitter.com/kE4c3YofFX
— ANI (@ANI) March 31, 2026






























































