लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीचे पेटवले घर, दोन जणांचा मृत्यू

973

एका तरुणीने लग्नाला नकार दिला म्हणून एका तरुणाने तिचे घर जाळले आहे. यात दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच वर्षाच्या बालकाचा समावेश आहे.

आंध्र प्रदेशच्या गोदावरी जिल्ह्यातील श्रीनू नागामणी या 19 वर्षाच्या तरुणाने एका तरुणीला लग्नाची मागणी घातली होती. तेव्हा ती लग्नासाठी तयार होती. तसेच दोघांच्या घरच्यांनाही हे लग्न मान्य होते. परंतु श्रीनुच्या वाईट सवयी आणि त्याचे वागणे तरुणीला न पटल्याने तिने लग्न मोडले. याचा राग श्रीनुने मनात धरला होता.

काही दिवसांनंतर तरुणीचे लग्न दुसर्‍या तरुणासोबत झाले. 17 जानेवारी रोजी श्रीनूने तरुणीच्या आईवर चाकूने हल्ला केला. त्यात ती थोडक्यात बचावली. तरुणीच्या आईने पोलिसांत धाव घेतली, परंतु पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही.

बुधवारी पहाटे 4.30 च्या सुमारास श्रीनुने पेट्रोल टाकून तरुणीच्या घराला आग लावली. आग लागल्यानंतर घरातील दोघांचा मृत्यू झाला आहे. यात पाच वर्षाच्या बालकाचा समावेश आहे तसेच कुटुंबातील दोन सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर गुन्हेगार श्रीनु पळण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी तत्काळ त्याला अटक करून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या