
चैत्र महिन्यातील शेवटच्या मंगळवारी नालंदा जिह्यातील शितला मातेचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. गर्दीमुळे अचानक दर्शनाच्या रांगेत चेंगराचेंगरी झाली. त्यात 9 जणांचा मृत्यू झाला. त्यात आठ महिलांचा समावेश असून त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर एका पुरुषाने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. 20 पेक्षा जास्त भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दर्शनासाठी मोठी गर्दी होणार असल्याची कल्पना असूनही पुरेशी व्यवस्था करण्यात आली नव्हती. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे मृत्यू झाल्याचा आरोप भाविकांनी केला आहे.
नालंदा येथील मंदिराच्या परिसरात चैत्र महिन्यानिमित्त जत्रा भरली होती. भाविकांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील मंदिराचा परिसर लहान आहे. मंदिराचा गाभारा लहान आहे. मोठी गर्दी असल्यामुळे भाविक लवकर दर्शनासाठी एकमेकांना ढकलत होते. त्यातच मोठा गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. घटना घडली त्यावेळी दर्शनासाठी सुमारे 25 हजार भाविक रांगेत उपस्थित होते. अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये सारे संपले होते. गर्दी नियंत्रित करण्यासाठी रांगेचे नियोजन करण्यात आले नव्हते. चेंगराचेंगरीप्रकरणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी चौकशीचे आदेश दिले असून दीपनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजमणि यांना निलंबित करण्यात आले आहे.
चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे?
प्रत्यक्षदर्शी भाविकांनी दिलेल्या माहितीनुसार चेंगराचेंगरीमागे दोन संभाव्य कारणे समोर आली आहेत. काही भाविकांनी
सांगितले की, दर्शन लवकर आटोपण्यासाठी पुजारी घाई करत होते. त्यातच रांगेत असलेली एक महिला चक्कर येऊन पडली. तिला सांभाळताना काही जणांनी गर्दी मागे लोटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भाविक पडले. दुसरे कारण म्हणजे, मंदिरात पैसे घेऊन भाविकांना प्रवेश दिला जात होता. त्यास विरोध केल्यामुळे वाद झाला आणि चेंगराचेंगरी झाली, असा आरोप काही भाविकांनी केला आहे.
राष्ट्रपतींच्या दौऱ्यात सर्व सुरक्षा, मंदिर सोडले वाऱ्यावर
राष्ट्रपती मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत नालंदा विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ पार पडला. त्यासाठी सुरक्षा व्यवस्थेत 8
जिह्यांमधील 2500 पेक्षा जास्त पोलिसांना तैनात करण्यात आले होते. त्यामुळे मंदिरात उपस्थित असलेल्या 25 हजार भाविकांची सुरक्षा वाऱयावर होती. या ठिकाणी एकही पोलीस तैनात नव्हता, असा आरोप भाविकांनी केला आहे.


























































