
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त राज्यभरातून शिवभक्त दाखल झाले असून गुरुवारी पहाटे अरुंद वाटेवर मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. त्यात अनेक शिवभक्त जखमी झाले असून त्यांना जुन्नर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुरेसा पोलीस बंदोबस्त आणि नियोजन नसल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप शिवभक्तांकडून करण्यात आला.
शिवनेरीवर बुधवारपासूनच शिवजयंती उत्सवासाठी शिवभक्तांची रीघ लागली होती. गडावर उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास अंबरखान्याच्या खाली असलेल्या हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजा या भागात मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली. तिथे अरुंद वाटेवर मोठी गर्दी झाल्याने गोंधळ निर्माण झाला आणि चेंगराचेंगरी होऊन स्थिती नियंत्रणाबाहेर गेली. अनेकजण एकमेकांवर पडले, काहींचा श्वास गुदमरला. या घटनेत महिला व मुलांसह अनेक शिवभक्त जखमी झाले. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
तिघेजण घसरून खाली पडले
शिवभक्तांचा एक जथा शिवज्योत घेऊन गडावर दाखल झाला. ज्योत घेऊन काही युवक वेगाने पुढे सरकत होते. यावेळी मीना दरवाजाजवळ बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनी त्यांना हळू जाण्याचे आवाहन केले. यावेळी गर्दीमुळे तिघेजण घसरून खाली पडले. या घटनेत त्यांना किरकोळ दुखापत झाली, अशी माहिती याबाबत पोलीस अधीक्षक संदीप सिंग यांनी दिली. गडावर पुरेसा बंदोबस्त तैनात होता. या घटनेनंतर अतिरिक्त खबरदारी घेऊन टप्प्याटप्प्याने शिवभक्तांना गडावर प्रवेश दिला गेला. गडावरून उतरताना सर्वांनी शिस्त पाळावी, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आल्याचेही संदीप सिंग यांनी सांगितले.


























































