गर्दीच्या वेळी लोकलच्या दारात उभे राहणे म्हणजे निष्काळजीपणा नाही

लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या नातेवाईकांना भरपाई देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रेल्वे प्रशासनाला मुंबई उच्च न्यायालयाने आज खडे बोल सुनावले. कामावर जाणाऱ्या प्रवाशाला पिकअवरला लोकलमध्ये शिरणे कठीण असते. अशा वेळी जीव धोक्यात घालून प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे गर्दीच्या वेळी फुटबोर्डवर उभे राहून प्रवास करणे म्हणजे निष्काळजीपणा नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना भरपाई देण्याचा आदेश कायम ठेवला. 28 ऑक्टोबर 2005 रोजी पश्चिम रेल्वेवर भाईंदरहून मरीन लाईन्सला प्रवास करताना प्रवासी लोकल ट्रेनमधून पडला. या अपघातात जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या नातेवाईकाला भरपाई देण्याचे आदेश रेल्वे प्राधिकरणाने दिले. प्राधिकरणाच्या या निर्णयाविरोधात हायकोर्टात केंद्र सरकारने याचिका दाखल केली आहे.