मला घरी जायचंय, आता हे सहन होत नाहीये!; मियामी ओपनमधील पराभवानंतर स्टार टेनिसपटू कार्लोस अल्काराझला अश्रू अनावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टेनिस विश्वातील उदयोन्मुख तारा आणि आघाडीचा टेनिसपटू कार्लोस अल्काराझला मियामी ओपनमध्ये सलग दुसऱ्या वर्षी आपला गाशा लवकर गुंडाळावा लागला. हार्ड रॉक स्टेडियमवर सुरू असलेल्या मियामी ओपनमध्ये तिसऱ्या फेरीच्या अटीतटीच्या सामन्यात अमेरिकेच्या सेबॅस्टियन कोर्डाने अल्काराझचा पराभव करत त्याला स्पर्धेबाहेर केले. या पराभवानंतर मैदानातच अल्काराझ भावूक झाला.

आक्रमक खेळासाठी ओळखला जाणारा अल्काराझ या सामन्यातील पराभवानंतर पूर्णपणे हतबल दिसला. पहिला सेट 3-6 ने गमावल्यानंतर आणि दुसऱ्या सेटमध्ये सर्व्हिस ब्रेक झाल्यावर त्याने आपल्या बॉक्सकडे (कोचिंग टीम) बघून हताशपणे उद्गार काढले. “मला आता हे सहन होत नाहीये. मी घरी जातोय… मला आता हे अजिबात शक्य नाहीये”, असे अल्काराझ म्हणाला.

पराभवानंतर दिलेल्या प्रतिक्रियेदरम्यान अल्काराझने सामन्याच्या निर्णायक आणि महत्त्वाच्या क्षणी आपली कामगिरी प्रतिस्पर्ध्यापेक्षा कमी पडल्याचे प्रांजळपणे कबूल केले. हा सामना अत्यंत चुरशीचा होता. कोर्डाने आज अप्रतिम कामगिरी केली. सामन्यात असे अनेक क्षण आले ज्याचा मी फायदा घेऊ शकलो नाही. महत्त्वाच्या क्षणी तो माझ्यापेक्षा सरस ठरला, असे अल्काराझने पुढे नमूद केले.

गेल्या वर्षीही अल्काराझचा याच स्पर्धेत डेव्हिड गॉफिनकडून पराभव झाला होता. गेल्या आठवड्यात इंडियन वेल्सच्या उपांत्य फेरीत डॅनिल मेदवेदेवने अल्काराझचा पराभव केला. अल्काराझचा हा मोसमातील दुसरा मोठा पराभव असून, यामुळे त्याच्या मियामीमधील खराब कामगिरीचे सत्र कायम राहिले आहे.