
उत्तर प्रदेशमध्ये एका पाच वर्षाच्या चिमुरडीचा भुकेने तडफडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आग्राच्या बरोली अहीर गावात ही घटना घडली आहे. स्थानिक नागरिकांनी मुलीच्या मृत्यूसाठी स्थानिक प्रशासन जबाबदार असल्याचे सांगितले आहे. स्थानिक प्रशासनाने लॉकडाऊन काळात कुटुंबाला काहीच मदत केली नसल्याचा आरोप केला आहे. या प्रकारामुळे देशातील भूकबळीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
‘मी माझ्या मुलीला सांभाळण्यात अय़शस्वी ठरले. लॉकडाऊननंतर हातातलं काम गेलं गेल्या काही दिवसांत मी व नवरा कामाच्या शोधात होतो. मात्र काहीच काम मिळत नव्हतं. घरात अन्नाचा दाना नव्हता. आम्ही आठवड्याभरापासून काहीच खाल्लेले नाही. मुलीने ताप घेतला. त्यातच आम्ही तिला कायमचं गमावलं’, असं मुलीच्या आईने सांगितलं. मुलीच्या शेजारी राहणाऱ्यांनी या प्रकरणी स्थानिक प्रशासनाला जबाबदार धरले आहे.
दोन वर्षांपूर्वी मध्य प्रदेशमध्ये देखील अशीच घटना घडली होती. मध्यप्रदेशमधील भिंड जिल्ह्यात एका दोन वर्षीय मुलीचा भुकेने तडफडून मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. या मुलीच्या वडिलांची नोकरी गेल्याने दोन दिवसांपासून त्यांच्या घरात जेवणच बनले नव्हते. अखेर दोन दिवसांनी त्या मुलीने भुकेने तडफडून प्राण सोडले.


























































