विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने कोरोनाच्या तिसऱया लाटेचा दिलेला इशारा व आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाही हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे. मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून येत्या सोमवारी होणाऱया संसदीय कामकाज समितीच्या बैठकीत हिवाळी अधिवेशनाच्या तारखा ठरविण्यात येतील.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणार होते. या दृष्टीने प्रशासकीय हालचालीही सुरू झाल्या होत्या. त्यानंतर 7 डिसेंबरऐवजी पुढील तारखेला नागपूरमध्ये घेता येईल का, याबाबतही चर्चा झाली. मात्र कोरोनाच्या तिसऱया लाटेचा धोका कायम असल्याने हे अधिवेशन मुंबईतच घेण्यावर एकमत होऊ लागले. त्यानुसार आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अधिवेशन मुंबईतच घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अधिवेशनाची तारीख सोमवारी निश्चित करण्यात येणार आहे.

अधिवेशनाला दोन डोसचे सर्टिफिकेट आवश्यक असून हे डोस पूर्ण झाले असले तरी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.