
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरल्या जाणाऱ्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट करणे किंवा नावे वगळण्याची कार्यवाही तसेच अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दिले.
सर्वपक्षीय नेत्यांनी दिनेश वाघमारे यांची आयोगाच्या कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली. त्या वेळी वाघमारे यांनी मतदार यादीविषयी खुलासा केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी लागू असलेल्या अधिनियमाच्या तरतुदीनुसार भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली विधानसभा मतदारसंघाची यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते. त्यासाठी अधिसूचित दिनांक निश्चित केला जातो. त्यानुसार 1 जुलै 2025 या अधिसूचित दिनांकाला अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत, असे वाघमारे यांनी स्पष्ट केले.
प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे आणि पत्ते कायम ठेवले जातात. मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरुस्त्यांबाबत हरकती आणि सूचना मतदार दाखल करू शकतात, असेही वाघमारे यांनी सांगितले.
या बैठकीत प्रमुख प्रचारकांच्या संख्येत आणि उमेदवारांच्या निवडणूक खर्चात वाढ करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी केली. त्यानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या प्रमुख प्रचारकांच्या संख्येची मर्यादा 20वरून 40 करण्याबाबत विचार करण्यात येईल. तसेच उमेदवारांच्या निवडणूक खर्चातही यथोचित वाढ करण्याबाबत आयोग योग्य तो निर्णय घेईल, असे आश्वासन दिनेश वाघमारे यांनी दिले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी सुरू असून सध्या प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रारूप किंवा अंतिम मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचबरोबर मतदार यादीची छायांकित प्रत संबंधित ठिकाणी उपलब्ध असेल. त्यासाठी प्रतिपृष्ठ दोन रुपयेप्रमाणे शुल्क भरावे लागेल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी या वेळी दिली.



























































