राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा, सीसीएमपी कोर्स केलेल्या डॉक्टरांची एमएमसीमध्ये नोंद होणार

राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने सीसीएमपी अर्थात सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांची नोंद महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या स्वतंत्र नोंदवहीत करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे राज्यभरातील तब्बल 1 लाख होमिओपॅथी डॉक्टरांना मर्यादित स्वरूपात आधुनिक औषधोपचार करण्याचा अधिकार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य शासनाने 2014 साली होमिओपॅथी डॉक्टरांसाठी आधुनिक औषधशास्त्रावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रम म्हणजेच सीसीएमपी अभ्यासक्रम सुरू केला होता. ग्रामीण आणि दुर्गम भागात प्राथमिक आरोग्य सेवा सक्षम करण्याच्या दृष्टीने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता. या अभ्यासक्रमासंदर्भात सरकारने 30 जून 2025 रोजी आदेश काढून कोर्स पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांची नोंद महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडे करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

इंडियन मेडिकल असोसिएशनचा विरोधदाखल केली होती याचिका

सरकारच्या या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशनचा तीव्र विरोध असून पुणे शाखेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, मात्र न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा दिला नाही. राज्य सरकारच्या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाचा निर्णय लक्षात घेता. राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाने आज अधिकृत आदेश काढला.