
सामना प्रतिनिधी । मुंबई
रविवारी ताडदेव येथे लागलेल्या आगीत गाडय़ांचे कोणतीही फिटनेस सर्टिफिकेट जळून खाक झालेली नाहीत तर यासंदर्भातील सर्व डेटा संगणकाच्या सर्व्हरवर सुरक्षित स्थितीत साठवून ठेवण्यात आला आहे अशी माहिती राज्य सरकारने आज हायकोर्टात दिली.
गाडय़ांची तपासणी न करताच त्यांना फिटनेस सर्टिफिकेट देण्यात येत असल्याप्रकरणी पुण्यातील श्रीकांत कर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली त्यावेळी याचिकाकर्त्यांची बाजू मांडणाऱया ऍड. उदय वारुंजीकर यांनी ताडदेव आरटीओला लागलेल्या आगीत फिटनेस सर्टिफिकेट जळाल्याबाबत सरकारला विचारणा केली. राज्य सरकारची बाजू मांडणारे अॅड. अभिनंदन वग्यानी यांनी हा सर्व डेटा कॉम्प्युटरवर सुरक्षित असल्याची माहिती खंडपीठासमोर दिली. ब्रेकची वेगळी टेस्ट घेण्यासाठी शासनाने अधिसूचना काढली होती, परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे हायकोर्टाच्या निदर्शनास याचिकाकर्त्यांनी आणून दिल्यावर खंडपीठाने सरकारला खडसावले. एखादे गॅरेज आरटीओचे टेस्टिंग स्टेशन कसे काय असू शकते असे फटकारत हायकोर्टाने शासनाला यासंदर्भात जाब विचारला त्यावेळी गाड्यांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणार असून त्यासाठी तीन कोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली. हायकोर्टाने हा युक्तिवाद ऐकून घेत याबाबतची सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब केली.
नागरिकांचे हाल
मुंबईतील महत्त्वाचा आरटीओ असलेल्या ताडदेव आरटीओच्या लाकडी बराकींना रविवारी मोठी आग लागूनही येथील कर्मचाऱ्यांनी उपलब्ध सामुग्रीतून कामकाज चालविण्याचा सोमवारी प्रयत्न केला. सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत संगणक यंत्रणा सुरळीत न झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. सायंकाळनंतर हळूहळू संगणक यंत्रणा सुरू होऊन रात्री उशिरा संगणक यंत्रणा पूर्वपदावर आली. दिवसभरात नोंदणी केलेल्या २८० पैकी २३२ जणांना शिकाऊ ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात आले. आगीच्या वृत्ताने बहुतांश उमेदवार परीक्षेसाठी आलेच नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
आगीत भस्मसात झालेल्या २९ हजार स्मार्ट कार्डांपैकी सात हजार कार्डस् ही प्रिंटिंग झालेली होती. आता या सात हजार कार्डस्ची पुन्हा छपाई करावी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लर्निंग लायसन्स ही ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर लागलीच देण्यात येत असल्याने या कार्डांची कोणतीही हानी झाली नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
आगींचा इतिहास
ताडदेव आरटीओला आगी लागल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यापूर्वी ३१ जानेवारी २०१५ रोजी ‘बी’ कार्यालयाला आग लागली होती. त्यानंतर ३ मार्च २०१५ रोजी जप्त केलेल्या वाहनांच्या भंगाराला आग लागली होती. रविवारी आगीच्या तिसऱया घटनेत मोठय़ा प्रमाणात वित्तहानी झाली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱयांनी मंगळवारपासून संपाचा इशारा दिल्याने पुन्हा आरटीओच्या कामात खंड येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.



























































