
70 व्या वरिष्ठ गट पुरुष महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत’ नंदुरबार, कोल्हापूर, ठाणे, मुंबई उपनगर यांनी महिलांत, तर सांगली, नाशिक यांनी पुरुषांत उपांत्य पूर्व फेरी गाठली. पुणे, नाशिक, मुंबई शहर, पालघर यांनी महिलांत, तर नगर, नांदेड, मुंबई शहर, मुंबई उपनगर हे गट विजेते ठरल्याने ते थेट उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले.
पहिल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात प्रथमच खेळणाऱया नंदुरबारने धुळ्याचे आव्हान 30-15 असे संपुष्टात आणले. मध्यांतराला 17-07 अशी आघाडी घेणाऱया नंदुरबारने नंतरदेखील तोच पवित्रा घेत 15 गुणांच्या फरकाने सामना जिंकला.
दुसऱया सामन्यात कोल्हापूरने अत्यंत चुरशीच्या लढतीत रत्नागिरीचा प्रतिकार 35-23 असा मोडून काढला. पहिल्या डावात 12-14 अशा 2 गुणांनी पिछाडीवर पडलेल्या कोल्हापूरने दुसऱया डावात आपला खेळ गतिमान करीत हा विजय साकारला. ठाण्याने नांदेडचा 73-17 असा धुव्वा उडवीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. ठाण्याने सुरुवातीपासूनच झंझावाती खेळ करीत पाऊण शतकाजवळ गुणसंख्या नेली. माधुरी गवंडीचा अष्टपैलू खेळ, तिला प्राजक्ता पुजारी, निकिता कदम यांची मिळालेली चढाई-पकडीची साथ यामुळे हे सहज शक्य झाले. शेवटच्या सामन्यात मुंबई उपनगरने सायली जाधव, प्रणाली नागदेवता यांच्या चतुरस्र खेळाच्या जोरावर रायगडला 39-21 असे नमविले. मध्यांतराला 26-10 अशी उपनगरकडे आघाडी होती.
पुरुषांच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात सांगलीने नंदुरबारला 44-33 असे रोखत आगेकूच केली. विश्रांतीला दोन्ही संघ 19-19 असे समान गुणांवर होते. विश्रांतीनंतर सांगलीच्या सौरभ कुलकर्णी, ओंकार इंजल यांनी गतिमान चढाया करीत सामना आपल्या बाजूने झुकविला. त्यांना अक्षय निकमने भक्कम बचाव करीत उत्तम साथ दिली. नंदुरबारकडून ऋषिकेश बनकर, निखिल शिंदे, राहुल ढोबळे यांनी बऱयापैकी लढत दिली.
































































