
वातावरणीय बदलांवरील उपाययोजना करण्यासाठी उद्यावर विसंबून न राहता आजच उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यासाठी प्रत्येक घटकाने वेगळा विचार न करता सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
‘क्लायमेट चेंज 2.0 – मोबिलायझिंग फंड फॉर कोस्टल सिटीज’ या विषयावरील दोनदिवसीय परिषदेचे उद्घाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते येथे झाले त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई फर्स्टच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित या परिषदेत मुंबई फर्स्टचे नरेंद्र नायर, युरोपियन युनियनचे राजदूत उगो अस्तुतो, मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार आदींसह जागतिक पातळीवरील पर्यावरणतज्ञ उपस्थित होते.
उष्णतेची तीव्रता वाढतेय
मी मागील दशकात राज्यात होत असलेले वातावरणीय बदल अनुभवले आहेत. जेथे दुष्काळ असे तेथे आता पूरस्थिती निर्माण होत आहे. उष्णता, पाऊस आणि थंडीची तीव्रता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर इतिहासात काय घडले यापेक्षा भविष्यात ते घडू नये यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कोविडने माणसाला एकमेकांची मदत करणे शिकविले, त्याचप्रमाणे वातावरणीय बदल ही आपत्कालीन परिस्थिती असून यावर मात करण्यासाठी सर्वांनी एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
वातावरणीय बदलांचा मुकाबला
वातावरणीय बदलांचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी खांद्याला खांदा लावून काम करताना प्रत्येक राज्य वेगळे गृहीत न धरता देश पातळीवर एकच राष्ट्रीय परिषद असावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांविषयी माहिती या वेळी प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी दिली. एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवास यांनी एमएमआरडीएमार्फत पारंपरिक परिवहन सुविधांऐवजी मेट्रोवर भर देण्यात आल्याचे सांगितले.



























































