सीएसएमटीवर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा, सरकारची विधिमंडळात घोषणा

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकास वेगाने सुरू असून त्या आराखडय़ाचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने या स्थानकातच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे ठरवले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

शिवसेनेचे गटनेते भास्कर जाधव यांनी सीएसएमटी स्थानकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात यावा तसेच मुंबई सेंट्रल स्थानकाला नाना शंकरशेट यांचे नाव देण्याची मागणी विधानसभेत केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवेदन करताना ही माहिती दिली.

जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश झाल्याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे फडणवीस यांनी यावेळी आभार मानले.

मुंबई सेंट्रल नव्हे, नाना शंकरशेट स्थानक… पाठपुरावा करणार

नाना जगन्नाथ शंकरशेट यांचा मुंबईच्या जडणघडणीत फार मोठा वाटा आहे. त्यांचे नाव मुंबई सेंट्रल स्थानकाला देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. त्याचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.