शेअर बाजारात दाणादाण 9.43 लाख कोटी स्वाहा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोमवारी शेअर बाजार जोरात कोसळला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1635 अंकांनी कोसळून 71,947 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 488 अंकांनी घसरून 22,331 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स 26 महिन्यांनंतर पहिल्यांदा 72 हजार अंकांच्या खाली आला आहे. शेअर बाजाराच्या घसरणीचा गुंतवणूकदारांना जबर फटका बसला असून त्यांच्या संपत्तीत तब्बल 9.43 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सेन्सेक्स 14 फेब्रुवारी 2024 नंतर पहिल्यांदा 72 हजार अंकांखाली आला. निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये मार्च महिन्यात 10.5 टक्के घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव 3 टक्के वाढून 115.98 डॉलर प्रति बॅलरवर पोहोचला आहे. या महिन्यात आतापर्यंत कच्चे तेलाच्या किमती 60 टक्क्यांनी वाढल्या आहेत. अमेरिकेच्या कच्च्या तेलाच्या किमतीसुद्धा 3 टक्के वाढून 102.52 डॉलर प्रति बॅलरपर्यंत पोहोचल्या आहेत. बँकिंग आणि फायनान्शियल शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. विदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतल्याने शेअर बाजारात घसरण झाली. विदेशी गुंतवणूकदारांनी शुक्रवारी हिंदुस्थानी शेअर बाजारातून 4,367 कोटी रुपये काढून घेतले.