Share Market News – शेअर बाजाराची घसरगुंडी सुरुच; सेन्सेक्स 1100, निफ्टी 200 अंकांनी कोसळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका, इस्रायल-इराण युद्धामुळे जागतिक शेअर बाजारासह हिंदुस्थानातील शेअर बाजारही दबावाखाली आहेत. युद्धाच्या काळातही बाजाराने तेजी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही तेजी दोन दिवसांपेक्षा जास्त टिकली नाही. जागतिक घडामोडींमुळे सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती आणि ज्याची भीती होती तेच घडले.

सोमवारी आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी परदेशातून आलेल्या नकारात्मक संकेतांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवात निराशाजनक झाली आणि बाजार उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण झाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक सेन्सेक्स त्याच्या मागील बंद भावाच्या तुलनेत १,१०० हून अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टीदेखील ३०० हून अधिक अंकांनी घसरला. बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्येही मोठी घसरण झाली. ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि कोटक बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. सुरुवातीच्या मोठ्या घसरणीनंतर बाजाराने सावरण्याचा प्रयत्न केला आणि त्यात थोडी सुधारणा दिसून आली.

सोमवारी शेअर बाजाराचे व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स त्याच्या मागील बंद भावाच्या ७३,५८३ वरून मोठी घसरण होऊन ७२,५६५ वर उघडला. काही मिनिटांतच, हा निर्देशांक १,१९२ अंकांच्या घसरणीसह ७२,३९१ वर पोहोचला. निफ्टी शुक्रवारच्या २२,८१९ च्या बंद भावापेक्षा घसरून २२,५४९ वर उघडला आणि त्यानंतर ३४९ अंकांनी घसरून २२,४७० वर व्यवहार करत होता. त्यानंतर त्यात थोडी सुधारणा दिसून आली. सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 828.18 अंकांच्या म्हणजेच 1.13 % घसरणीसह 72,746.62 वर व्यवहार करत होता. तर निफ्टी 223.40 अंकांच्या म्हणजेच 0.98% घसरणीसह 22,520 . 75 वर व्यवहार करत होता.

सोमवारच्या बाजारातील घसरणीदरम्यान बँकिंग शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात ॲक्सिस बँक शेअर (४%), कोटक बँक शेअर (३%), एचडीएफसी बँक शेअर (२.५०%), आयसीआयसीआय बँक शेअर (१.७०%), आणि एसबीआय शेअर (१.१०%) घसरणीसह व्यवहार करत होते. याशिवाय, बीएसईच्या लार्ज-कॅप निर्देशांकात बजाज फायनान्स शेअर (२%) आणि भारती एअरटेल शेअर (१.५०%) घसरले.

भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण होण्याची चिन्हे परदेशी बाजारांमधून आधीच दिसू लागली होती. जपान, कोरिया आणि हाँगकाँगचे आशियाई शेअर बाजार मंदीत होते. जपानचा निक्केई निर्देशांक २,३८२ अंकांनी, म्हणजेच ४.५० टक्क्यांनी घसरून ५०,५६६ वर आला. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांकही ४९० अंकांनी, म्हणजेच १.९५ टक्क्यांनी घसरून २४,४६९ अंकांवर बंद झाला. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांकही कोसळला, तो २१५ अंकांनी, म्हणजेच ३.९६ टक्क्यांनी घसरून ५,२२३ अंकांवर बंद झाला. डॅक्स (३१२ अंक), सीएसी (६७ अंक) आणि एफटीएसई-१०० निर्देशांकही घसरणीच्या स्थितीत होते.