
शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली व्यावसायिकाची 7 कोटी 71 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. नीलेश परमार आणि अफसर खान अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. गेल्या वर्षी त्यांना शेअर ट्रेडिंगबाबत मेसेज आला. त्यानंतर त्यांच्याशी एका महिलेने संपर्क केला. तिने त्याना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देऊ, असे सांगितले होते. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी शेअरमध्ये गुंतवणूक केली.
केलेल्या गुंतवणुकीवर त्यांना चांगला नफा झाला होता. त्यानंतर तक्रारदार यांनी विविध शेअरमध्ये एकूण 7 कोटी 71 लाख 50 हजार रुपयाची गुंतवणूक केली. त्या गुंतवणुकीवर देखील त्यांना 38 कोटींचा फायदा झाल्याचे भासवण्यात आले.
तक्रारदार यांना मूळ रकमेसह परतावा न देता त्याची फसवणूक केली. ती रक्कम ट्रान्स्फर करण्यासाठी त्याच्याकडे आणखी पैशांची मागणी करण्यात आली. त्यांनी पैसे ट्रान्स्फर करण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. तपासा दरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नीलेश आणि अफसर यांना ताब्यात घेतले. त्या दोघांना सुरत येथून मुंबईत आणले. फसवणुकीची काही रक्कम त्या दोघांच्या खात्यात ट्रान्स्फर झाली होती.
























































