
जागतिक घडामोडी आणि अनिश्चिततेचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. अमेरिका- हिंदुस्थानमध्ये व्यापार करार झाल्यानंतर शेअर बाजार ऑल टाईम हायजवळ आला होता. आता काही दिवसातच बाजार नवी उच्चांक स्थापन करेल, अशी अपेक्षा गुंतवणूकदारांना होती. मात्र, बाजाराने सपशेल निराशा केली असून ऑल टाईम हायजवळ जाणारा बाजार अचानक कोसळला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी सलग दुसऱ्या दिवशी घसरणीच्या स्थितीत आहेत. ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून येत आहे. तसेच सोने आणि चांदीतही मोठी घसरण झाली आहे.
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. त्याचाही परिणाम शेअर बाजारावर झाला आहे. त्यामुळे शेअर बाजारात लक्षणीय घसरण दिसून आली आहे. सेन्सेक्स , ३५० अंकांनी घसरून ८३,००० च्या खाली व्यवहार करत होता. तर निफ्टी १५० अंकांनी घसरून २५,५०० वर व्यवहार करत आहे. बीएसईच्या टॉप ३० शेअर्सपैकी २१ शेअर्समध्ये घसरण झाली आहे, तर नऊ शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे. आयटी शेअर्समध्ये मोठी विक्री झाली आहे. टेक महिंद्रा, टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो सारखे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. एनटीपीसी, एचडीएफसी आणि मारुती हे सर्वात जास्त घसरले आहेत.
शेअर बाजारातील घसरणीसोबतच सोने आणि चांदीमध्येही घसरण दिसून येत आहे. वायदे बाजारात चांदीचा भाव १२,००० रुपयांनी घसरून २.२९ लाख रुपयांवर आला. सोने जवळजवळ २००० रुपयांनी घसरले आहे आणि आता ते १.४९ लाख रुपयांवर आहे. सोने आणि चांदीच्या घसरणीसोबतच, सोने ईटीएफ जवळजवळ २% ने घसरले आहेत, तर चांदी जवळजवळ ६% ने घसरली आहे. गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजार कॉमेक्समध्ये चांदी २०% ने घसरली, ज्याचा परिणाम शुक्रवारी एमसीएक्सवर दिसून आला.
गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात वॉल स्ट्रीटवर विक्री वाढली, ज्यामुळे जागतिक आणि आशियाई बाजारांमध्ये मोठी घसरण झाली. शुक्रवारी भारतीय शेअर बाजारातही असाच परिणाम जाणवला. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल सरासरी जवळजवळ ६०० अंकांच्या घसरणीसह बंद झाली. एस अँड पी ५०० मध्ये पुन्हा एकदा १ टक्क्यांहून अधिक घसरण झाली, ज्यामुळे आयटी शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.


























































