
शेअर बाजारासाठी बुधवार मंगलकारक ठरला आहे. अमेरिका, इस्रायल इराण युद्ध सुरू झाल्यानंतर शेअर बाजारात निफ्टीमध्ये सुमारे 12 टक्क्यांची म्हणजे 3500 अंकांची घसरण झाली होती. बाजार सवारण्याचा प्रयत्न करत अशला तरी जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत मिळत नसल्याने बाजारात अपेक्षित तेजी येत नव्हती. मात्र, दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधीची घोषणा झाली अन् बाजाराला सकारात्मक संकेत मिळताच शेअर बाजाराने तेजीत प्रवेश केला आहे.
बुधवार हा शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम दिवस ठरला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी जोरदार सुरुवात केली आणि नंतर मोठ्या उसळीसह तेजीने बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स अखेर २,९४६ अंकांनी वाढून ७७,५६२ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ८७३ अंकांनी उसळी घेत २४,००० अंकांच्या जवळ बंद झाला.
बाजारातील या दिवसभराच्या तेजीमध्ये, अनेक मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वेगाने वाढ झाली. इंडिगोपासून हिंदुस्तान पेट्रोलियमपर्यंत आणि रिलायन्सपासून बजाजपर्यंतच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. या तेजीत गुंतवणूकदारांनी तब्बल १६ लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे.
बुधवारी बीएसई सेन्सेक्स ७४,६१६ च्या आदल्या दिवसाच्या बंद भावापेक्षा मोठी वाढ नोंदवत ७७,२९० अंकांवर उघडला आणि दिवसभरातील व्यवहारादरम्यान तो ७७,६३५ अंकांपर्यंत वाढला. बाजार बंद होईपर्यंत ही तेजी कायम राहिली आणि सेन्सेक्स अखेर २,९४६.३२ अंकांनी म्हणजेच ३.९५% नी वाढून ७७,५६२.९० अंकांवर बंद झाला.
निफ्टीनेही सेन्सेक्सचे अनुसरण केले. निफ्टी २३,१२३ च्या मागील बंद भावापेक्षा वाढून २३,८५५ वर उघडला आणि त्यानंतर थोड्याच वेळात २४,००० चा टप्पा ओलांडला. जरी अखेरीस त्याची गती थोडी मंदावली असली तरी निर्देशांक ८७३.७० अंकांनी किंवा ३.७८% नी वाढून २३,९९७.३५ अंकांवर बंद झाला.
शेअर बाजारातील या जोरदार तेजीमुळे गुंतवणूकदारांना मोठा नफा झाला आहे. बीएसईचे बाजार भांडवल एकाच झटक्यात जवळपास १६ लाख कोटी रुपयांनी वाढले. आदल्या दिवशी बाजार भांडवल ४,२९,२६,३०८.७६ कोटी रुपये होते, जे बुधवारी बाजार बंद होताना ४,४५,५७,५७१.४५ कोटी रुपयांवर नोंदवले गेले. याचा अर्थ गुंतवणूकदारांना १६,३१,२६३ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.


























































