पश्चिम उपनगरातील उच्चभ्रू नशेबाजांना बोरिवली पोलिसांमुळे चांगलाच धक्का बसला आहे. या नशेबाजांसाठी विक्रीसाठी आणलेला लाखो रुपये किमतीचा हेरॉईन ड्रग्जचा साठा बोरिवली पोलिसांनी वेळीच पकडला. हे ड्रग्ज विकण्यासाठी आलेल्या एका फेडररला पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
बोरिवली परिसरात कुठलाही बेकायदेशीर कारभार होऊ नये यासाठी पोलिसांनी पंबर कसली आहे. त्यानुसार अपर आयुक्त अभिषेक त्रिमुखे, वरिष्ठ निरीक्षक शिंदे, निरीक्षक प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकटीकरण पथकाचे अधिकारी उपनिरीक्षक इंद्रजित पाटील हे परिसरावर लक्ष ठेवून असताना पहाटेच्या सुमारास एक राजा नावाचा ड्रग्ज पेडलर एस.व्ही. रोडवरील सुधीर फडके उड्डाणपुलाजवळ एका अल्पवयीन मुलाला ड्रग्ज विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पाटील यांना मिळाली. त्यानुसार पाटील व त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून तो पेडलर तेथे येताच त्याला उचलले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 33 ग्रॅम वजनाचा व तीन लाख 30 हजार किंमतीचा हेरॉईन ड्रग्जचा साठा मिळून आला. त्यानंतर पोलिसांनी जहांगीर गौर (37) आणि फरहान गौर (25) यांच्या दिंडोशी येथील घराची झडती घेतली असता तेथे 28 ग्रॅम वजनाचा व दोन लाख 28 हजार किंमतीचा हेरॉईनचा साठा मिळून आला. अशा प्रकारे बोरिवली पोलिसांनी ड्रग्ज तस्करांना पकडून तब्बल सहा लाख 10 हजार किंमतीचा 61 ग्रॅम वजनाचा हेरॉईन ड्रग्जचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे पश्चिम उपनगरातील उच्चभ्रू नशेबाजांना दणका बसला आहे.