13 वर्षांपूर्वी चोरी झालेली 80 वर्षे जुनी रत्नजडीत सँडल सापडली !

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

अमेरिकेतील मिनेसोटा संग्रहालयातून 13 वर्षांपूर्वी चोरी झालेली माणिक जडवलेली सँडल सापडली आहे. ही सँडल कोठून आणि कशी मिळाली याची माहिती पोलिसांनी दिलेली नाही. सँडल चोरी झाल्याबाबातची आणि परत मिळाल्याबाबतची माहिती संग्रहालयाकडूनही देण्यात आलेली नाही. ही सँडल सुमारे 80 वर्षांपूर्वीची आहे. 2005 मध्ये या सँडलची चोरी झाल्यानंतर 13 वर्षांपासून त्यांचा शोध सुरू होता.

ऑस्करविजेत्या ‘विजर्ड ऑफ ओज’ चित्रपटात हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जूडी गारलँड यांनी 1939 मध्ये या सँडल घातल्या होत्या. या सँडलचा 10 लाख डॉलर (7 कोटी रुपये) विमा काढण्यात आला होता. सध्या याची किंमत 30 लाख डॉलर (21 कोटी रुपये) आहे. सँडल चोरी झाल्यापासून त्या शोधण्यासाठी पोलिसांनी जंगंजंग पछाडले होते. चोरी झाली त्यादिवशी संग्रहालायातील सीसीटीव्ही बंद असल्याने पोलिसांनी कोणताही पुरावा मिळाला नव्हता. सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने चोरट्यांनी सहजतेने संग्रहालयाची काच तोडून सँडल चोरले होते. पोलिसांनी शोध घेऊनही त्यांना काहीच माहिती मिळत नव्हती. एका रेस्टॉरंटच्या भिंतीमध्ये या सँडल सजवून ठेवण्यात आल्याचे काही लोकांनी सांगितले. तर लोखंडाच्या खाणीत या सँडल फेकण्यात आल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या सर्व माहितीची पोलिसांनी शहानिशा केली. मात्र, त्यांना त्यात काहीही तथ्य आढळले नाही. तसेच या सँडलबाबत माहिती देणाऱ्याला 10 लाख डॉलरच्या बक्षीसाची घोषणाही करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात या सँडलसारख्या अनेक सँडल बाजारात आल्याने पोलिसांसमोरचे आव्हान वाढले होते.

ही सँडल परत मिळण्याची आशा आम्ही सोडून दिली होती, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, गेल्यावर्षी याबाबतचा पुरावा हाती लागल्याने या सँडल परत मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या सँडलचा विमा उतरवलेल्या कंपनीकडे एकाने वर्षभरापूर्वी विम्याच्या पैशांची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी एफबीआयची मदत घेतली आणि सँडलचोरीचा छडा लावून परत ती संग्रहालयात ठेवण्यात आली आहे. सँडलमध्ये जडवण्यात आलेली रत्ने आणि माणिक सुस्थितीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यात काहीही फेरबदल करण्यात आलेला नाही. या बनावट सँडल नसल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले. सँडल चोरीच्या या घटनेवर 2015 मध्ये ‘हू स्टोल रुबी स्लिपर्स’ नावाची डॉक्युमेंटरी बनवण्यात आली होती.