
सामना प्रतिनिधी । अहमदपूर
अहमदपूर तालुक्यातील शिंदगी (बु.) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गावात निघालेल्या मिरवणुकीत समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. म्रणुकीत सहभागी झालेल्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. अहमदपूर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनंतर 11 जणांवर गुन्हे दाखल करून 4 जणांना अटक करण्यात आली आहे.
शिंदगी (बु.) या गावात शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत संध्याकाळी 5.30 वाजता गावातील अंकुश देवकते , माधव मुळे, गंगाधर मुळे , शिवदास मुळे , भानुदास मुळे , संभाजी मुळे , विशाल मुळे , बालाजी मुळे, विजयकुमार मुळे , ओमकार मुळे यांच्यासह काही अनोळखी व्यक्ती आल्या. त्यांनी मिरवणुकीवर अचानक हल्ला करुन मिरवणुकीत सहभागी झालेल्यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी मारहाण केली. तसेच मिरवणुकीवर दगडफेकही केली. या प्रकरणी गौतम जाभाडे यांनी अहमदपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार 11 जणावर कलम 3 (1) आर एस अनुसूचित जाती अधिनियम 143,147,149,336,341,323,324 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांना ताब्यात घेण्यात आले असून चार जणांना अटक करण्यात आली आहे.
मिरवणुकीवर दगडफेक झाल्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना बोलावल्याने पुढील अनर्थ टळला आहे. गावकऱ्यांना शांतता पाळून कोणत्याही अफवावंर विश्वास ठेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.अश्विनी शेलार करीत आहेत.
























































