अलिबाग मेडिकल कॉलेजच्या जागी दगडधोंडे; डॉक्टरांची पहिली बॅच येईल तरी इमारत उभी राहिना

अलिबागच्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीचे भूमिपूजन होऊन साडेतीन वर्षे उलटले असले तरी या प्रकल्पाची एकही वीट अद्याप रचण्यात आलेली नाही. मेडिकल कॉलेजच्या जागेवर फक्त दगडधोंडे गोळा करून ठेवले आहेत. नव्याने स्थापन झालेल्या या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांची पहिली बॅच २०२६ मध्ये बाहेर पडणार आहे. या बॅचला बाहेर येण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी उरलेला असला तरी अद्याप इमारत उभी राहिलेली नाही. त्यामुळे सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात या महाविद्यालयाला परवानगी मिळाली. अलिबाग तालुक्यातील उसर गावात ५२ एकर जागेवर वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत आरसीएफ वसाहती आणि जिल्हा रुग्णालयात महाविद्यालय सुरू करण्यात आले. २२ फेब्रुवारी २०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, खासदार सुनील तटकरे, तत्कालीन पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत महाविद्यालयाच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला होता.

राजकीय हस्तक्षेपामुळे काम रखडले
२०२२ साली कामाचे भूमिपूजन होऊनही एक वीटही रचली गेली नाही. मधल्या काळात राज्यात सत्तांतर झाले आणि राजकीय परिस्थितीमुळे महाविद्यालयाच्या इमारतीचे काम रखडले. जागेबाबत स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध होता तो प्रशासनाने आपल्या स्तरावर मिटवला आहे. शासनाने नव्याने बांधकामाची निविदा काढली होती. यामध्ये रँक प्रोजेक्ट अॅण्ड डेव्हलपमेंट आणि केपीसी प्रोजेक्ट्स लिमिटेड, चेन्नई यांना काम देण्यात आले आहे.

52 एकर जागा आरक्षित
अलिबाग तालुक्यातील उसर येथे ५२ एकर जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आरक्षित करण्यात आली आहे. यामध्ये २८ एकर जागेत ५०० खाटांचे रुग्णालय आणि महाविद्यालय उभारले जाणार आहे, तर उर्वरित जागेत महिलांसाठी आणि आयुर्वेदिक रुग्णालय प्रस्तावित आहे. मेडिकल कॉलेजच्या इमारतीचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया आरोग्य विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.