संकेश्वर-बांदा महामार्ग पूर्णत्वास जात असताना, आजरा शहराजवळ होत असलेला टोलनाका तत्काळ बंद करावा; अन्यथा 10 जूनला तालुक्यातील जनतेच्या वतीने टोल-मुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढून टोल हद्दपार करू, असे निवेदन महामार्ग टोल विरोधी कृती समितीच्या वतीने आजरा तहसीलदार आणि पोलीस विभागाला देण्यात आले.
संकेश्वर-बांदा महामार्गाचे काम दीड वर्षापासून सुरू आहे. या रस्त्यासाठी अनेक शेतकऱयांच्या जमिनी घेतलेल्या आहेत. खरेतर कोणत्याही प्रकल्पाचे काम बाधित शेतकऱयांच्या संपादित जमिनी, घरांचा मोबदला दिल्यावरच काम सुरू करावे, असा कायदा सांगतो. पण इथे कायदा बाजूला ठेवून रस्त्याचे काम सुरू झाले. वड, पिंपळ, जांभूळ अशा स्थानिक प्रजातीच्या हजारो झाडांची कत्तल केली गेली. त्यामुळे शेतकरी आणि स्थानिक जनतेच्या मनात तीव्र असंतोष आहे.
त्यातच भर म्हणून रस्त्याचे काम अपूर्ण असतानाच, या महामार्गावर आजरा शहराजवळ टोलनाका उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. खरेतर संकेश्वर-बांदा हा 108 किलोमीटर लांबीचा दोनपदरी रस्ता केंद्र सरकारच्या निधीतून विकसित होत आहे. तशी जाहिरात प्रसिद्ध झाली. मूळ किंमत 500 कोटी रुपये असताना, कागदोपत्री 299 कोटीच खर्च होत आहेत. या पार्श्वभूमीवर हा रस्ता शासन बांधत असल्याने आणि बांधा-वापरा व हस्तांतरित करा (बीओटी)तत्त्वावर नसल्याने टोल वसूल करणे चुकीचे आहे. एखाद्या खासगी कंपनीला लूट करण्यास परवानगी दिल्यासारखाच हा प्रकार राज्य अथवा केंद्र शासनाकडून होत असल्याची शंका आहे. आजरा साखर कारखान्याचा हंगाम सुरू झाल्यानंतर उसवाहतूक करणाऱया शेकडो वाहनांना आणि पर्यायाने तालुका ऊसउत्पादक शेतकऱयांना या टोलचा फटका बसणार आहे. याबाबतची स्पष्टता नसल्याने यास विरोध आहे. या विरोधात टोलमुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली 10 जूनला मोर्चा काढण्यात येणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर संपत देसाई, प्रभाकर कोरवी, परशुराम बामणे, पांडुरंग सावरतकर, राजू विभूते, अल्बर्ट डिसोझा, गौरव देशपांडे, जोतिबा आजगेकर आदींच्या सह्या आहेत.