वादळी पावसाचा गोव्याला तडाखा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शुक्रवारी पहाटेपासून वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. समुद्र खवळलेला असल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.आगामी 24 तासात राज्यात मुसळधार पाऊस वादळी वाऱ्यासह पडेल असा इशारा पणजी वेधशाळेने दिला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असून तो गाव्याच्या दिशेने सरकत आहे. हवामान खात्याने  चार दिवसांपूर्वीच मच्छिमारांना खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा दिलेला आहे. त्यामुळे मांडवी नदीच्या पात्रात गुरुवारी सर्वत्र मच्छीमारी ट्रॉलर्स विखुरलेल्याचे चित्र दिसत होते. मच्छीमारी व्यवसायावर देखील वादळी पावसाचा गंभीर परिणाम झालेला आहे.

ऑक्टोबरच्या अखेरीस एवढया मोठय़ा प्रमाणात पाऊस कधीच पडला नाही. परंतु सध्या कोसळत असलेल्या पावसाने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. दरम्यान गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे मि.मीमध्ये. म्हापसा 90 मिमी, पेडणे 64.8, फोंडा 60.4, पणजी 114.5, जुने गोवे 97.2, सांखळी 72.2, वाळपई 39.8, काणकोण 103.6, दाबोळी 111.2, मडगाव 78.1, मुरगाव 163.9, केपे 40, सांगे 59.6 मिमी.

राज्यात पडणारा पाऊस हा पुढील दोन दिवस म्हणजेच 26 ऑक्टोबरपर्यंत मुसळधारपणे पडणार आहे, असा इशारा पणजी वेधशाळेने दिलेला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्टय़ाचे चक्रिवादळात रुपांतर झालेले आहे. रत्नागिरीपासून ते 390 तर मुंबई पासून 460 कि.मी. दूरवर हे वादळ तयार झालेले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस राज्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या मुसळधार पावसामुळे यावर्षी दिवाळीतील नरकासूर स्पर्धा अनेक संस्थांनी रद्द केल्या आहेत. राज्यात अनेक ठिकाणी नरकासूर प्रतिमा तयार करण्याचे कामही आता उत्साही युवकांनी सोडून दिले. अनेक ठिकाणी नरकासूर प्रतिमा भिजून गेलेल्या आहेत. त्यामुळे नरकासूर प्रतिमा दिवाळीत बांधून पूर्ण होतील की नाही याची शाश्वती देता येत नाही.

गोव्यावरील धोका टळला
अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा गेल्या सहा तासांमध्ये पूर्व-उत्तर दिशेने ताशी 7 किलोमीटर गतीने सरकला आहे. त्यामुळे गोव्यावरील धोका टळलेला आहे. काल गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या दरम्यान हा कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात स्थिरावला असून तो रत्नागिरीपासून 310 कि.मी, मुंबईपासून 450 कि.मी, सलाल्ह ओमानपासून 1790 किलोमीटर अंतरावर तो आहे. आगामी 12 तासात तो पुढे सरकून चक्रीवादळात रुपांतर होऊ शकते. 25 ऑक्टोबर सायंकाळपर्यंत ते पुढे सरकत जाईल आणि नंतर पुन्हा वळण घेऊन दक्षिण ओमानपासून समुद्रीतटीय प्रदेशांमध्ये जाण्याची शक्यता आहे.