होर्मुझची नाकेबंदी! ट्रम्प यांचा आक्रमक पवित्रा; आता एकाही जहाजाला येण्या-जाण्याची परवानगी दिली जाणार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणसोबत इस्लामाबादमध्ये झालेली शांतता चर्चा निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली आहे. “अमेरिका लवकरच होर्मुझची सामुद्रधुनी येणाऱ्या-जाणाऱ्या जहाजांची नाकेबंदी सुरू करेल,” असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आखाती क्षेत्रातील तणाव वाढण्याची शक्यता आहे.

Truth Social पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “अमेरिकन नौदल तातडीने होर्मुझमध्ये प्रवेश करणाऱ्या किंवा बाहेर पडणाऱ्या सर्व जहाजांना रोखण्याची प्रक्रिया सुरू करेल. आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात इराणला टोल देणाऱ्या प्रत्येक जहाजाचा शोध घेऊन त्याला रोखण्याचे निर्देश मी नौदलाला दिले आहेत.” इराण या महत्त्वाच्या सागरी मार्गाबाबत दिलेली आश्वासने पाळण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

इस्लामाबादमध्ये इराणी अधिकाऱ्यांसोबत सुमारे २१ तास मॅरेथॉन चर्चा झाली. या चर्चेत अनेक मुद्द्यांवर सहमती झाली असली, तरी इराणच्या परमाणु कार्यक्रमावर कोणताही तोडगा निघू शकला नाही. यावर बोलताना ट्रम्प म्हणाले, “इराण कधीही परमाणु शस्त्रे मिळवू शकणार नाही. जोपर्यंत इराण आपल्या परमाणु कार्यक्रमावर रोक लावत नाही, तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा सुरू ठेवणे अमेरिकेला मान्य नाही.”

होर्मुझमध्ये जहाजांकडून टोल वसूल करण्याच्या इराणच्या कृतीला ट्रम्प यांनी जबरन वसुली, (Exortion) असे संबोधले आहे. समुद्रात पेरलेल्या सुरुंगांविषयी (माईन्स) बोलताना ते म्हणाले की, “अमेरिका हे सुरुंग हटवण्याची कारवाई वेगाने करेल. या कामात गुंतलेल्या अमेरिकन जहाजांवर जो कोणी इराणी गोळीबार करेल, त्याला नरकात धाडले जाईल.”

इराणची लष्करी क्षमता आता कमकुवत झाली असून त्यांची नौदल आणि हवाई संरक्षण यंत्रणा बऱ्याच अंशी निकामी करण्यात आली आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला. अमेरिकन सुरक्षा दलांवर किंवा व्यापारी जहाजांवर हल्ला झाल्यास कडक प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.