
पुण्यात कारमधून जात असताना अचानक कुत्रे आडवे आल्याने वाहनचालकाने ब्रेक दाबल्यामुळे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार गरवारे पुलावरुन भुयारी मार्गात कोसळल्याने अपघात घडला. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही. ही घटना रविवारी मध्यरात्री 12 वाजून 10 मिनिटांनी घडली.
डेक्कन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज काळगुंदे आणि इतर तिघे मित्र जंगली महाराज रोडवरील हॉटेलमध्ये जेवायला आले होते. जेवण झाल्यानंतर घरी जात असताना गरवारे पुलाजवळ त्यांच्या मोटारीसमोर अचानक कुत्रे आडवे आले. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा मोटारीवरील ताबा सुटला. त्यामुळे मोटार कठडा तोडून गरवारे अर्ध भुयारी मार्गात कोसळली. मोटारीचा आवाज ऐकून लोक धावत गेले. त्यांनी मोटारीतील चौघांना बाहेर काढले. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

























































