
शहरात हजारोंच्या संख्येने भटकी कुत्री असून ती रोजच वयोवृद्ध आणि लहान मुलांचे लचके तोडत आहेत. अशीच एक भयंकर घटना आज सकाळी घडली. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीवर चार ते पाच भटक्या कुत्रांनी हल्ला केला. एका नागरिकाने घरातून बाहेर येऊन या विद्यार्थिनीची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केल्याने तिचा जीव वाचला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
कॅम्प नंबर 5 मच्छी मार्केट रस्त्यावर महानगरपालिकेची शाळा आहे. शनिवारी सकाळी याच शाळेत शिक्षण घेणारी विद्यार्थिनी जात असताना तिच्या मागून आलेल्या चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. तिची ओढणी दातांनी ओढली. विद्यार्थिनी जिवाच्या आकांताने ओरडत पळत असताना तिचा आवाज ऐकणाऱ्या एका नागरिकाने घरातून बाहेर पडून तिची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी या कुत्र्यांना हाकलून दिल्यावर ही विद्यार्थिनी घाबरत घाबरत जीव मुठीत घेऊन शाळेत गेली. या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर येथील भटकी कुत्री सतत हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून महानगरपालिकेने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.