
‘सिलिकॉन सिटी’ अशी ओळख असलेल्या बंगळुरूमध्ये भटक्या कुत्र्यांना बिर्याणी किंवा चिकन-भात खाऊ घातला जाणार आहे. बंगळुरूमध्ये 2.79 लाख भटके कुत्रे असून या कुत्र्यांच्या देखभालीसाठी एक विशेष योजना सुरू करण्यात आली आहे. बंगळुरू महानगरपालिकेने (बीबीएमपी) शहरातील 5,000 हून अधिक भटक्या कुत्र्यांना दररोज चिकन भात खायला घालण्याची एक अनोखी योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव चिकन भात भाग्य योजना आहे, ज्यासाठी महापालिकेने 2.88 कोटी रुपयांची तरतूदसुद्धा केली आहे. या पैशातून बंगळुरू शहरातील 8 झोनमधील भटक्या कुत्र्यांना आता चिकन बिर्याणी मिळणार आहे. गेल्या सहा महिन्यांत बंगळुरूमध्ये 13,748 भटक्या कुत्र्यांनी लोकांना चावण्याचा प्रयत्न केला आहे. कुत्रे चावण्याच्या आक्रमतेमागे त्यांना भूक लागणे हे महत्त्वाचे कारण आहे, असे तज्ञांचे मत आहे. भटक्या कुत्र्यांना बिर्याणी खाऊ घालण्यासाठी प्राणी कल्याण आणि आरोग्य विभागांतर्गत हा नवीन उपक्रम सुरू केला आहे.
कुत्रे चावण्याच्या घटना घटतील
बंगळुरू शहरात ही योजना राबविल्यामुळे भटक्या कुत्र्यांना बिर्याणी खायला मिळेल. या प्रत्येक बिर्याणी प्लेटची किंमत 22 रुपये असेल. बिर्याणीमुळे रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या लोकांना भटके कुत्रे चावणार नाहीत. कुत्रे चावण्याच्या घटना घटतील, असे सांगितले जात आहे. कुत्र्याला दररोज 367 ग्रॅम चिकन बिर्याणी दिली जाईल.




























































