एसटीची 10 टक्क्यांची हंगामी भाडेवाढ रद्द, टीकेची झोड उठताच  24 तासांत सरकारला उपरती

राज्यातील गंभीर पूर परिस्थितीतही एसटीच्या 10 टक्के भाडेवाढीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची लूट करण्याचा सरकारचा डाव सपशेल फेल ठरला. मंगळवारी एसटीची हंगामी भाडेवाढ जाहीर केल्यानंतर टीकेची झोड उठली आणि 24 तासांच्या आत ती भाडेवाढ रद्द करण्याची नामुष्की महायुती सरकारवर ओढवली.

मागील आठवडाभरापासून राज्यातील जनता अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीने हवालदिल झाली आहे. याचा विचार न करताच मंगळवारी एसटीची 10 टक्क्यांची तिकीट दरवाढ जाहीर करण्यात आली होती. पुरामुळे हवालदिल झालेल्या जनतेला पुरेशी आर्थिक मदत न करता सरकारने एसटीच्या आडून ‘लूट’ सुरू ठेवण्याचे पाऊल उचलले. त्यावर जोरदार टीका झाली. त्यामुळे हादरलेल्या महायुती सरकारने भाडेवाढ मागे घेतली.

दुसरा प्रयत्नही फसला

गणेशोत्सवाच्या कालावधीतही एसटीच्या ग्रुप बुपिंगमध्ये 30 टक्क्यांची भाडेवाढ जाहीर केली होती. त्याला तीव्र विरोध झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाडेवाढीचे ते परिपत्रक रद्द केले होते. त्यानंतर सव्वा दोन महिन्यांतच दिवाळी हंगामाच्या निमित्ताने 10 टक्क्यांची भाडेवाढ जाहीर करण्यात आली होती.