‘महिला सन्मान योजना’अंतर्गत एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरामध्ये 50 टक्के सवलत दिली जाते. महिलांना केवळ तिकीट दरात सवलत देऊन चालणार नाही, तर योजनेच्या नावाप्रमाणे त्यांचा ‘सन्मान’देखील केला पाहिजे, या हेतूने अक्षरा केंद्र या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने एसटीने ‘जागा दाखवा’ हा संदेश सर्व प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. बऱ्याचदा गर्दीचा गैरफायदा घेऊन सार्वजनिक ठिकाणी विशेषतः रेल्वे, लोकल, एसटीमध्ये महिलांची छेडछाड केली जाते. त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. या विरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे. महिलांनी अशा प्रकारच्या गैरप्रकारांना वेळीच आळा घालण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्याबरोबरच अशा महिलांना सहकारी प्रवाशांनीदेखील सहकार्य केले पाहिजे असा संदेश देणाऱ्या चित्रफिती आजपासून प्रत्येक बसस्थानकावर दाखवल्या जाणार आहेत. या चित्रफितीद्वारे महिलांचा प्रवासादरम्यान सन्मान करावा असा संदेश दिला जाणार आहे.