
सामना ऑनलाईन । भोपाळ,
व्हॉट्सऍप ग्रुपवर येणारा कोणताही मेसेज फॉरवर्ड करण्याची तुम्हाला सवय असेल तर यापुढे सावध रहा, ग्रुप ऍडमिनने तर डोळ्यात तेल घालून ग्रुपवर येणार्या पोस्टकडे लक्ष दिलेले बरे कारण वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याप्रकरणी मध्य प्रदेशातील तालेन गावातील १७ वर्षीय तरूण मागील पाच महिन्यांपासून तुरूंगात शिक्षा भोगत आहे. हा तरुण बीएस्सी द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असून तो ऍडमिन असलेल्या व्हॉट्सऍप ग्रुपवर एक वादग्रस्त पोस्ट शेअर झाल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर राजद्रोहाचा गुन्हाच दाखल केला आहे.
जुनैद मेव असे या तरुणाचे नाव आहे. जुनैद ऍडमिन असलेल्या एका व्हॉट्सऍपच्या ग्रुपवर काही महिन्यांपूर्वी एक वादग्रस्त पोस्ट शेअर करण्यात आली होती. ही पोस्ट या ग्रुपचा मूळ ऍडमिन असलेल्या राजा गुर्जर नावाच्या व्यक्तीने शेअर केली होती. पोस्ट शेअर केल्यानंतर तो या ग्रुपमधून बाहेर पडला. क्हॉट्सऍप ग्रुपच्या मूळ ऍडमिनने ग्रुप सोडल्यानंतर त्याच्या जागी दुसरी क्यक्ती ऍडमिन बनते असे अपडेट काही दिवसांपूर्वी क्हॉट्सऍपवर आले होते. याच फीचरमुळे जुनैद पाच महिन्यांपासून तुरुंगाची हवा खात आहे. गुर्जरनंतर अन्य दोन व्यक्ती ग्रुपच्या ऍडमिन बनल्या मात्र तेही ग्रुपमधून बाहेर पडले. त्यामुळे ग्रुप ऍडमिनची जबाबदारी जुनैदच्या खांद्यावर पडली. आणि तिथेच तो अडकला. या पोस्टमुळे काही लोकांनी ग्रुप ऍडमिनविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. गुर्जरने ग्रुप सोडल्यामुळे पोलिसांनी जुनैदला पकडले.
१४ फेब्रुवारीला याप्रकरणी आयटी कायद्याच्या कलम १२४ ए आणि २९५ ए अंतर्गत राजद्रोहाच्या आरोपाखाली जुनैदला अटक करण्यात आली होती. आजही तो या आरोपाखाली बालसुधारगृहात असून राजद्रोहाचा आरोप असल्याने जुनैदला जामीन नाकारण्यात आला आहे. त्यामुळे त्याला परीक्षेलाही बसता आले नाही. हा विषय न्यायालयात गेल्यानंतर त्याचा भाऊ मोहम्मद फकुरूद्दीन याने पोलिसांच्या तपासावर शंका व्यक्त केली आहे. पोलिसांनी कोणताही तपास न करता माझ्या भावाला यात गोवले असा आरोप त्याने केला आहे. सारंगपूर पोलिस ठाण्यातील अधिकारी प्रकाश मिश्रा यांनी याप्रकरणी काही पुरावे असतील तर ते जुनैदच्या कुटुंबियांनी न्यायालयात सादर करावेत, असे म्हटले आहे.
सोशल मीडियावर नियंत्रण नाही
सोशल मीडियावर पसरणार्या अफवा, वादग्रस्त पोस्ट याला लगाम घालण्यासाठी सध्या तरी केंद्र सरकारचा विचार नाही. राज्यसभेत उपस्थित केलेल्या एक प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री राजवर्धन राठोड यांनी सांगितले. केंद्र सरकार लवकरच सोशल मीडिया हब निर्माण करणार आहे. याद्वारे केंद्राची धोरणे, कार्यक्रम याची माहिती फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यूट्यूबवरून पोहोचविली जाणार आहे.

























































