
लैंगिक रूढी आणि परंपरा दूर सारून विद्यार्थ्यांना स्त्री-पुरूष समानतेचे धडे देण्यासाठी मुंबई महापालिका शाळेमध्ये ‘चेंजिंग मुव्ह, चेंजिंग माईंड्स’ (Changing Moves, Changing Minds) या उपक्रमाची सुरूवात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आली. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सहा आठवड्याच्या या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमधील ऊर्जा आणि कलागुणांना चालना देण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांनी हे करावे, आणि मुलींनी हे करावे, या विचारधारेला पूर्णविराम मिळणार आहे.
वरळी सीफेस महापालिका शाळेत ब्रिटीश कौन्सिल आणि जेम्स ऍण्ड ज्वेलरी नॅशनल रिलीफ फाऊंडेशनच्या सहकार्याने ‘चेंजिंग मुव्ह, चेंजिंग माईंड्स’ हा कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ऑक्टोबर 2019 पासून पालिका शाळांमध्ये हा हटके अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. या जेंडर एज्युकेशन प्रोग्रामसाठी 120 मास्टर प्रशिक्षक प्रशिक्षण देणार आहेत.
उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रकीण परदेशी, ब्रिटीश कौन्सिलचे संचालक बार्बरा किकहॅम, जेम्स ऍण्ड ज्वेलरी नॅशनल रिलीफ फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय कोठारी, कोरिओग्राफर टेरेन्स लुईस, शिक्षण समिती सभापती अंजली नाईक, शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे आदी उपस्थित होते.
- या उपक्रमाचा लाभ महापालिका शाळांमधील 2 हजार 630 शिक्षक आणि सुमारे 1.6 लाख विद्यार्थ्यांना घेता येईल. प्रसिद्ध कोरियोग्राफर टेरेन्स लुईस या उपक्रमाचे ब्रॅण्ड ऍम्बेसेडर असणार आहेत. दहा ते बारा वर्षे वयोगटातील पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम तयार करण्यात आला आहे.






























































