
पवई येथील आयआयटी मुंबईतील सात मजली वसतिगृहाच्या गच्चीवरून खाली उडी घेऊन 26 वर्षीय दर्शन मालवीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे घडली. आत्महत्या करणारा विद्यार्थी अनेक दिवसांपासून नैराश्यात होता. त्याच्यावर उपचारही सुरू होते.
दर्शन मालवीय याने आत्महत्येपूर्वी वसतिगृहातील फलकावर संदेश लिहिला होता. आपल्या आत्महत्येसाठी कोणालाही दोषी धरू नये, असे त्याने त्यात लिहिले होते, असे पोलिसांनी सांगितले. दर्शनचा मृतदेह वसतिगृहाच्या वॉचमनला आढळून आला. त्याने पोलिसांना त्यासंदर्भात माहिती दिली. दर्शन हा मूळचा मध्य प्रदेशातील राहणारा होता. आयआयटी मुंबईमध्ये तो गेल्या जुलैपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमाला शिकत होता. त्याच्या आत्महत्येनंतर आयआयटी मुंबईत हळहळ व्यक्त होत आहे.




























































