कपड्यांवर अश्लाघ्य कमेंट्स करणाऱ्या प्राध्यापकांविरोधात विद्यार्थिनींची तक्रार

सामना ऑनलाईन । मुंबई

कपडे, शरीरयष्टी यांच्यावर अश्लाघ्य कमेंट्स करणाऱ्या आणि पक्षपातीपणा करणाऱ्या दोन प्राध्यापकांविरोधात वांद्रे येथील रिझवी महाविद्यालयातल्या ३०० विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मोहिन मर्चंट आणि एजाझ कश्मिरी अशी या दोन प्राध्यापकांची नावं आहेत. या दोघांविरुद्ध जवळपास ३०० तक्रारी आल्या असून एका विद्यार्थिनीने मुंबई विद्यापीठाच्या महिला विकास विभागाकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे. तक्रार करूनही महाविद्यालय प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थी काळे कपडे घालून याचा निषेध करत आहेत.

मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार, या तक्रारदार विद्यार्थिनी इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्टचरच्या तृतीय आणि चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिनी आहेत. ज्या विद्यार्थिनीने महिला विकास विभागाकडे तक्रार केली आहे, तिने तक्रारीत मोहिन मर्चंट या प्राध्यापकाविरोधात वेळी अवेळी मेसेज पाठवणे, वैयक्तिक माहितीची चौकशी करणे, कपड्यांवर आक्षेप नोंदवणे असे आरोपही केले आहेत. मर्चंटने पीडितेच्या एका प्रकल्पावेळी परीक्षक म्हणून काम पाहिलं होतं. मात्र, तो तिला कोणताही विषय शिकवत नव्हता. तरीही त्यानंतर त्याने तिला मेसेज करून वैयक्तिक माहिती विचारायला सुरुवात केली. तिच्या कपड्यांवरही त्याने टिपण्णी करायला सुरुवात केली. एक दिवस संध्याकाळच्या सुमारास आपल्या केबिनमध्ये बोलवून मर्चंट याने आपल्या कपड्यांवर टिपण्णी केल्याचंही पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे. जवळपास दोन वर्षांपासून हा सर्व प्रकार सुरू होता. जेव्हा तिने या प्रकरणी तक्रार केली त्यानंतर तिच्यासोबत शिकणाऱ्या अनेक विद्यार्थिनींनीही अशाच प्रकारचे अनुभव आल्याचं म्हटलं.

त्यामुळे या विद्यार्थिनींनी मर्चंटविरुद्ध रिझवीचे उपप्राचार्य एजाझ कश्मिरी यांच्याकडे तक्रारी केल्या. मात्र कश्मिरी यांनी त्याविरोधात कोणतीही ठोस पावलं उचलली नाहीत. रिझवी महाविद्यालयात विद्यार्थिनी कल्याण समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र, या समितीने कोणतीही चौकशी केली नाही किंवा अहवालही सादर केला नसल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. रिझवीच्या प्रभारी प्राचार्या डॉ. श्रुती बर्वे यांनी मात्र महाविद्यालयाची समिती उत्तम काम करत असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं म्हटलं आहे.

summary- students complaints against two professors