
मरीन ड्राइव्ह येथील विल्सन जिमखान्याची जागा महसूल विभागातील अधिकाऱयांनी जैन संस्थेच्या घशात घातल्याच्या निषेधार्थ ‘आम्ही गिरगावकर’चे कार्यकर्ते, हजारो विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी आज आझाद मैदानात मोर्चा काढून तीव्र निषेध नोंदवला. मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल न घेतल्यास जिमखान्याभोवती सदरहू संस्थेने उभारलेल्या बॅरिकेड्स तोडून जागा ताब्यात घेण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
विल्सन जिमखान्याचा वाद मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यानंतरही भुलेश्वर महसूल विभागातील भूमी अभिलेख कार्यालयातील सहाय्यक अधीक्षक प्रदीप तावरे आणि भूमापक किशोर ढोकळे या अधिकाऱयांनी जिमखान्याची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन या संस्थेच्या ताब्यात दिली. त्याच्या निषेधार्थ आम्ही गिरगावकर संस्थेच्या पुढाकाराने विल्सन जिमखाना बचाव संघर्ष समितीने आज आझाद मैदानात मोर्चा काढला होता. त्या मोर्चामध्ये गिरगाव आणि मुंबईतील विद्यार्थी, पालक, नागरिक आणि सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते असे हजारो लोक सहभागी झाले होते. ‘अरे कोण म्हणतो देणार नाय, विल्सन जिमखाना परत घेतल्याशिवाय राहणार नाय!’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.
जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनने जिमखाना ताब्यात मिळताच तिथे मोठी हार्ंडग्ज लावून तसेच सभोवती बॅरीकेड्स उभारून आपला अधिकार गाजवायला सुरुवात केली आहे. स्थानिक मुलांना खेळण्यासाठी मज्जाव केला जात आहे, असा आरोप समितीने या वेळी केला. जिमखाना जैन संस्थेच्या ताब्यात देणाऱ्या अधिकाऱयांचे तातडीने निलंबन करण्यात यावे, नव्या क्रीडा मंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी या वेळी आम्ही गिरगावकर संस्थेच्या सचिव शिल्पा नायक यांनी केली. त्याचप्रमाणे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्या सहकार्याने लवकरच या प्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


























































